Marathi Political News Congress Nagpur Nitin Raut | Sarkarnama

सतीश चतुर्वेदीनंतर आता नितीन राऊत रडारवर?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या रडारवर माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या रडारवर माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत असल्याचे बोलले जात आहे.

सतीश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात नागपूर शहर काँग्रेस समितीच्या विरोधात बंडखोरी झाली आहे. चतुर्वेदी यांच्या बाजूने माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनीस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी आदी आहेत. गेल्या एक वर्षापासून हा संघर्ष सुरू होता. नागपूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात चतुर्वेदी यांनी आघाडी उघडली होती. विकास ठाकरे यांनी चतुर्वेदी यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले परंतु, ते असफल ठरले व महापालिका निवडणुकीत हे मतभेद टोकाला गेले.

काँग्रेसच्या विरोधात बंड करणाऱ्या चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्यानंतर आता नितीन राऊत यांचा क्रमांक असल्याचे बोलले जात आहे. चतुर्वेदी यांच्या हकालपट्टीवर नितीन राऊत यांनी कोणतीही अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिली नाही. राऊत यांच्याबद्दलही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज असल्याचे समजते. नितीन राऊत प्रदेश काँग्रेस समितीमध्ये उपाध्यक्षपदावर आहेत. राऊत प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीला सातत्याने गैरहजेर आहेत. त्यांच्या या 'अघोषित' बहिष्कारामुळे चव्हाण यांनी नितीन राऊत यांच्या या वागणुकीबद्दल विदर्भातील नेत्यांजवळ नापसंती व्यक्त व्यक्त केल्याचे समजते.

राऊत यांना शह देण्यासाठी काही दिवसांपूर्वी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना काँग्रेस पक्षात घेतल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर गजभिये यांनी उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाकडून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहिलेल्या नितीन राऊत यांच्यापेक्षा अधिक मते मिळविली होती. गजभिये यांना पक्षात घेऊन पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहील, याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. उत्तर नागपूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार मिळाल्याने राऊत यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

संबंधित लेख