Marathi Political News CM Cousine Threat | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाची नागपुरातील वकिलाला धमकी : नाना पटोलेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेची बाजू मांडणारे वकील अभियान बारहाते यांना जीवे मारण्याची धमकी संजय फडणवीस यांनी दिल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी खासदार नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. संजय फडणवीस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू आहेत.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेची बाजू मांडणारे वकील अभियान बारहाते यांना जीवे मारण्याची धमकी संजय फडणवीस यांनी दिल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी खासदार नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. संजय फडणवीस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू आहेत.

2014 च्या विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल असलेल्या संपूर्ण गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली नव्हती; त्यांच्यावर 24 गुन्हे दाखल असताना निवडणूक आयोगाकडे केवळ 22 गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली होती, असा आरोप करुन नागपुरात सतीश उके यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. या संदर्भात उके यांनी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत सतीश उके यांचे वकील अॅड. अभियान बारहाते आहेत.

''मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू संजय फडणवीस यांनी अॅड. बारहाते यांच्याशी 6 मार्च 2018 रोजी मोबाईलवर संपर्क साधला. यात संजय फडणवीस यांनी ''2019 मध्येही आमचेच सरकार येईल, तेव्हा तुम्हाला पोलिसापासून कुणीही वाचवू शकणार नाही. तेव्हा तुम्ही तक्रार करू नका. तुमच्या पत्नीचा आदर करतो. पुढे बघू काय होतय, ते आता'' अशी धमकी दिल्याचे सांगून या संवादाची ऑडीयो क्‍लिप माजी खासदार पटोले यांनी पत्रकारांना ऐकविली. 

या प्रकरणी अॅड. बारहाते यांनी नागपूर पोलिस आयुक्त व अजनी पोलीस ठाण्यात संजय फडणवीस यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. या धमकीमुळे अॅड. बारहाते यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील खटल्यातील सतीश उके यांचे वकीलपत्र मागे घेतले. संजय फडणवीस यांच्या धमकीमुळेच अॅड. बारहाते यांनी वकीलपत्र मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक वकिलांना धमकी देत आहे, या राज्यात कुणाचे राज्य आहे, असा प्रश्‍न आता पडला आहे, असेही पटोले म्हणाले.

''यापूर्वी 2003 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भादंवि 420 च्या गुन्हा दाखल झाला होता. एका जमिनीच्या वादावरून मदनलाल पराते यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल केला आहे. 420 चा गुन्हा दाखल असलेली व्यक्ती पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होऊ शकतात?'' असा सवाल पटोले यांनी केला. या दोन्ही मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

अॅड. बारहातेंना मी केवळ प्रेमळ समज दिली- संजय फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तसेच भाजपच्या विरोधात काही काम करू नका, अशा शब्दात अॅड. अभियान बारहाते यांना प्रेमळ समज दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू संजय फडणवीस यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

माजी खासदार नाना पटोले यांनी आरोप केल्यानंतर संपर्क साधला असता संजय फडणवीस म्हणाले, ''अभियान बारहाते हे भाजपचे पदाधिकारी होते. अनेक वर्षे त्यांनी भाजपचे काम केले आहे. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. परंतु काही कारणांमुळे त्यांनी पक्षाचे काम सोडले. या व्यक्तीगत संबंधामुळे आपण अॅड. बारहाते यांना केवळ समज दिली. मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाच्या विरोधात काही काम करू नका, असे सांगितले. यात त्यांना धमकावण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.'' राजकीय हेतूने हे आरोप केले जात असल्याचे संजय फडणवीस यांनी सांगितले.

 

संबंधित लेख