छिंदमचे नाव दिसेल तेथे खोडले : जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त ठरलेला भाजप नेता व उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. तसेच विविध संघटनांनी छिंदम नाव दिसेल तेथे ते खोडून टाकून निषेध केला. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त अधिक वाढविण्यात आला आहे.
छिंदमचे नाव दिसेल तेथे खोडले : जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

नगर : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त ठरलेला भाजप नेता व उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. तसेच विविध संघटनांनी छिंदम नाव दिसेल तेथे ते खोडून टाकून निषेध केला. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त अधिक वाढविण्यात आला आहे.

छिंदम याने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला काम सांगताना मोबाईलवरून बोलत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. संबंधित कर्मचाऱ्याचे हे काॅल रेकाॅर्डिंग कामगार संघटनेबरोबरच शहरातील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे शुक्रवारी शिवसेना व इतर संघटनांनी छिंदम याचे कार्यालय फोडले, घरावर दगडफेक केली. मोटारसायकलवरही दगड घातले. शहरात घोषणा देऊन या घटनेचा निषेध केला. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चाने जात छिंदम याच्या अटकेची मागणी केली. राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भाजप नेत्यांचा निषेध केला. 

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी छिंदम याची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच उपमहापाैरपदाचा राजीनामाही घेतला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात आंदोलने सुरू झाली. त्याचे पडसात राज्यभरातून उठून ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली. शुक्रवारी रात्री पोलिसांनी छिंदम याला अटक करून शनिवारी सकाळी लवकर न्यायायालयासमोर हजर केले. न्यायायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे त्याची रवानगी सबजेल मध्ये करण्यात आली. सबजेलमध्ये कैद्यांनी छिंदम यांची येथेच्छ धुलाई केली. हाणमारी झाल्याचे तुरुंगरक्षकांनी नाकारले असले, तरी त्यांनी छिंदम याला तातडीने इतर तुरुंगात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याला आधी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नेण्याचे ठरले. नंतर मात्र पोलिसांनी चकवा देत नाशिकच्या तुरुंगात ठेवले.

छिंदमचे नाव खोडले
शहरात छिंदम याच्या काळात झालेल्या विकास कामांच्या कोनशिला, प्रभागातील बाके आदींवरील छिंदम याच्या नावावर काळे फासण्यात आले. नाव दिसेल तेथे खोडण्यात आले. प्रभागात ठिकठिकाणी असलेल्या बाकांवर दगड घालून विविध संघटनांनी ते तोडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील झालेल्या कामाच्या कोनशिलेवरील छिंदम याच्यासह भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या नावावरही काळे फासण्यात आले. शहरातील सर्व फलक फाडून टाकण्यात आले. महापालिकेत छिंदम याच्या नावाची पाटी कचऱ्याच्या कुंडीत टाकून देण्यात आली. अद्यापही ही आंदोलने शांत झालेली नाहीत. प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको, आंदोलने सुरूच आहे.

काल छिंदम याच्या कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त असतानाही काही युवकांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकून हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानाने ही दुर्घटना टळली असली, तरी कार्यालयाच्या समोर पोलिस व्हॅन आडवी लावून संरक्षण वाढविण्यात आले. तसेच छिंदम याच्या घरासमोरही पोलिस पहारा ठेवण्यात आला आहे. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीगेट, चितळेरोड आदी परिसरात पोलिस संरक्षण वाढविण्यात आले आहे. खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयांनाही पोलिस संरक्षण देण्यात आले.

खासदार गांधी यांचे शहर जिल्हाध्यक्षपद धोक्यात
नगर शहरात भाजपमध्ये खासदार गांधी यांचा गट व अॅड. अभय आगरकर यांचा गट अशी गटबाजी आहे. खासदार गांधी यांनी शहर जिल्हाध्यक्षपद स्वतःकडे ठेवल्याने या दोन्ही गटांत मागील काही महिन्यांपासून वातावरण अधिक धुमसत आहे. छिंदम प्रकरणामुळे खासदार गांधी यांनी शहर जिल्हाध्यपद सोडावे, अशी मागणी आगरकर गटाने केली आहे. तसेच शहरातील भाजपची कार्यकारीणी बरखास्त करून नव्याने करावी, अशी मागणी अॅड. आगरकर समर्थकांनी केली आहे. त्यामुळे गांधी यांचे जिल्हाध्यक्षपद धोक्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com