Marathi Political News Chikhali Buldhana | Sarkarnama

चिखलीत आजवर बोंद्रे किंवा खेडेकरांनाच संधीचा इतिहास

अरूण जैन 
मंगळवार, 6 मार्च 2018

जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या चिखली येथे 1967 पासून आजवर गेल्या 50 वर्षांत मतदारांनी एकतर बोंद्रे किंवा खेडेकरांनाच आमदारकीची संधी दिली आहे. पुढे होणा-या 2019 च्या निवडणुकीतही राहुल बोंद्रे व नरेंद्र खेडेकरांना ही किमया करता येते का? हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
 

बुलढाणा : जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या चिखली येथे 1967 पासून आजवर गेल्या 50 वर्षांत मतदारांनी एकतर बोंद्रे किंवा खेडेकरांनाच आमदारकीची संधी दिली आहे. पुढे होणा-या 2019 च्या निवडणुकीतही राहुल बोंद्रे व नरेंद्र खेडेकरांना ही किमया करता येते का? हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
 
चिखली विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ आहे. संघपरिवारातील हे जिल्ह्यातील केंद्र आहे. शिवाय कै. त्र्यंबक भिकाजी पाटलांपासून या मतदारसंघाला बहुजन चळवळीचा वारसा आहे. 1962 मध्ये एकवेळ संतोषराव नारायण पाटील चिखली विधानसभेतून निवडणूक जिंकले. मात्र, त्यानंतर आळीपाळीने बोंद्रे किंवा खेडेकरांनाच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 

1967 ला त्र्यंबक भिकाजी खेडेकरांना संधी मिळाली. 1972 ला भारतभाऊ बोंद्रे आमदार झाले. 1978 ला जनार्दन बोंद्रे यांना संधी मिळाली. त्यानंतर सलग तीनवेळा  म्हणजे 1980-85-90  ला पुन्हा भारतभाऊ आमदार झाले. दरम्यान मंत्रीही झाले आणि सिंचनाच्या बाबतीत जिल्ह्याचा कायापालट केला. यानंतर 'हॅटट्रीक' साधली ती रेखाताई खेडेकरांनी. त्या सलग 1995-1999 व 2004 अशा तिनवेळा विजयी झाल्या. नंतरच्या 2009 व 2014 च्या निवडणुकीत मात्र नव्या पिढीतील तरूण राहूल बोंद्रे यांनी बड्या बड्यांना पाणी पाजून मोदी लाटेतही मतदारसंघ ताब्यात ठेवला.

यावेळेस 2019 च्या दृष्टीने पूर्वाश्रमीचे शिवसेनेचेच असलेले नरेंद्र खेडेकर काँग्रेसमधून पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले आहेत. आता थांबायाचे नाही असा चंग बांधूनच ते मैदानात उतरणार आहेत. अर्थात बोंद्रे व खेडेकरांनाच आजवर साथ देणारा हा मतदारसंघ नेमके काय करतो हे पाहण्यासाठी निदान वर्षभर वाट बघावी लागणार आहे.

संबंधित लेख