Marathi Political News Call Details Inquiry Nagar Bank | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

'त्यांच्या' कॉल डिटेल्सबाबत व्हावी स्वतंत्र चौकशी : नगर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण

अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
सोमवार, 5 मार्च 2018

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकरभरतीसंदर्भात बॅंकेच्या पदाधिकारी-अधिकाऱ्यांसह संबंधितांचे लॅंडलाइन व मोबाईल कॉल रेकॉर्ड विवरण, आर्थिक व्यवहार व त्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींची तपासणी करण्याची मागणी चौकशी दरम्यान झाली होती. तथापि, या बाबी सहकार खात्याच्या चौकशी पथकाच्या अधिकार कक्षेत नाहीत. त्यामुळे सक्षम शासकीय यंत्रणेकडून त्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी शिफारस नोकरभरतीप्रकरणी नेमलेल्या चौकशी पथकाने केली आहे.

नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकरभरतीसंदर्भात बॅंकेच्या पदाधिकारी-अधिकाऱ्यांसह संबंधितांचे लॅंडलाइन व मोबाईल कॉल रेकॉर्ड विवरण, आर्थिक व्यवहार व त्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींची तपासणी करण्याची मागणी चौकशी दरम्यान झाली होती. तथापि, या बाबी सहकार खात्याच्या चौकशी पथकाच्या अधिकार कक्षेत नाहीत. त्यामुळे सक्षम शासकीय यंत्रणेकडून त्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी शिफारस नोकरभरतीप्रकरणी नेमलेल्या चौकशी पथकाने केली आहे.

त्यामुळे आता लवकरच याबाबतची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ऍन्टीकरप्शन) यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता बॅंकेच्या संबंधित पदाधिकारी, अधिकारी व एजंटांच्या टोळीला फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल.
 
नगर तालुक्‍याचे सहकार उपनिबंधक राम कुलकर्णी, संगमनेरचे उपनिबंधक जयेश आहेर, श्रीगोंद्याचे सहायक निबंधक रावसाहेब खेडकर व नेवाशाचे सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या पथकाने नाशिक विभागाच्या सहनिबंधकांना दिलेल्या अहवालात ही बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सहनिबंधकांनी सहकार आयुक्‍तांमार्फत सहकार खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालातही हीच बाब मांडण्यात आली. त्यामुळे शासन स्तरावरच आता याबाबत निर्णय होऊन चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडे जाईल. तथापि, सीआयडी व 
अॅन्टीकरप्शन या दोन्ही विभागांकडील सोयी-सुविधा व यंत्रणांचा विचार करता या दोन्ही खात्याच्या पथकाला या चौकशीत मर्यादा येतील. त्यासाठी या दोन्ही खात्यांसह पोलिस खात्यातील 'तरबेज' व 'निडर' अधिकाऱ्यांचा समावेश असलेले खास पथक यासाठी नेमण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 'सकाळ'ने बॅंकेच्या नोकरभरतीची चौकशी चालू असतानाच ही बाब मांडली होती. त्याची दखल घेत चौकशी पथकाने 'सकाळ'ची ही मागणी आपल्या अहवालात अधोरेखित केली हे विशेष! 

'त्या' चौघांनाही जवळपास सारखेच गुण!
सुमारे एक हजार पानांचा चौकशी अहवाल 'सकाळ'ला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये चौकशी पथकाने एकंदर 12 महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत निष्कर्ष स्पष्टपणे नमूद केले आहेत. त्यामध्ये स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीच्या शिफारशीचा समावेश आहे. त्यामुळे आता बॅंकेचे संशयित पदाधिकारी, अधिकारी, त्यांनी नेमलेले एजंट व संबंधितांची या प्रकरणातून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचे जवळचे नातेवाईक अर्जुन भास्कर गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ यांचा मुलगा सचिन, संचालक जगन्नाथ राळेभात यांचा नातू ऋतुराज दत्तात्रय सरोदे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगा विशाल यांचा ज्युनिअर ऑफिसर या पदासाठीच्या अंतिम निवड यादीतील गुणानुक्रम अनुक्रमे 2, 7, 11 व 11 आहे. या चौघांनाही लेखी परीक्षेत 90 पैकी अनुक्रमे 78, 76, 77 व 77 असे गुण मिळाले आहेत. मुलाखतीला सर्वांना पाचपैकी पाच गुण आहेत. ही बाब आक्षेपार्ह असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

अकोल्याचे 25 आणि संगमनेरचे 26
बॅंकेचे अध्यक्ष हे अकोले तालुक्‍यातील असून, इतर तालुक्‍यांच्या तुलनेत या तालुक्‍यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात झालेली निवड आक्षेपार्ह आहे. ज्युनिअर ऑफिसरपदी निवड झालेल्या एकूण 236 उमेदवारांपैकी 25 उमेदवार एकट्या अकोले तालुक्‍यातील आहेत. गुणानुक्रमे पहिल्या 50 मधील 12 उमेदवार अकोले तालुक्‍यातील आहेत. लेखनिकपदी निवड झालेल्या 159 उमेदवारांपैकी 21 उमेदवार अकोले तालुक्‍यातील आहेत. त्यामध्ये गुणानुक्रमे पहिल्या 50 मध्ये 13 उमेदवार अकोले तालुक्‍यातील असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे. उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेर तालुक्‍यातील असून, या तालुक्‍यातूनही ज्युनिअर ऑफिसरपदासाठी इतर तालुक्‍यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अंतिम यादीत आक्षेपार्ह निवड झाली आहे. या पदासाठी निवड झालेल्या एकूण 236 उमेदवारांपैकी 26 उमेदवार एकट्या संगमनेर तालुक्‍यातील आहेत, असा निष्कर्ष पथकाने काढला आहे. 

लिपिकासाठी प्रथम, अधिकारीपदाला नगण्य गुण
लिपिकपदासाठी सोमनाथ कारभारी बनकर या उमेदवाराची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. मात्र, याच उमेदवारास ज्युनिअर ऑफिसरपदाच्या लेखी परीक्षेत आक्षेपार्हरीत्या 90 पैकी अवघे 24 गुण मिळाले आहेत. त्याने फक्त 29 प्रश्‍न सोडविले. एकाच दिवशी झालेल्या व समान काठिण्य पातळी असणाऱ्या दोन पदांच्या लेखी परीक्षांमध्ये एकाच उमेदवाराची कामगिरी मोठ्या प्रमाणात विरोधाभास दर्शविणारी असल्याचे पथकाने अहवालात मांडले आहे. 

दोन वेगवेगळ्या शैली व शाईचा वापर
काही संशयास्पद उमेदवारांच्या लेखी परीक्षेत एकाच उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेत उत्तरे काळे करण्यासाठी दोन वेगवेगळ्या शैलींचा व शाईचा वापर आढळून येणे, उत्तरे आक्षेपार्हरीत्या सलगपणे बरोबर येणे व चुकणे, नकारात्मक गुण मूल्यांकन पद्धती नसतानादेखील काही प्रश्‍नांची उत्तरे न सोडविणे अशा आक्षेपार्ह बाबी पथकाला आढळून आल्या, असे अहवालात म्हटले आहे. काही उमेदवारांच्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत मात्र अशा आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्या नाहीत, असा उल्लेखही पथकाने आवर्जून केला आहे. 

संशयितांनी कार्बन कॉपी सादर केलीच नाही
निवडक उमेदवारांना परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपीची मूळ प्रत व छायांकित प्रत सादर करण्याबाबत पथकाने सांगितले होते. त्यापैकी काही उमेदवारांनी सादर केलेल्या कार्बन कॉपीवर आक्षेपार्ह विशिष्ट असे निळे डाग आढळून आले. लेखी परीक्षेत अनियमितपणे झालेले फेरफार उघडकीस न येण्यासाठी मूळ कार्बन कॉपीवर कार्बन पेपरसदृश वस्तूमुळे विशिष्ट असे शंकास्पद निळे डाग पडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. अनेक संशयास्पद उमेदवारांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेच्या कार्बन कॉपीची मूळ व छायांकित प्रत सादर केलीच नाही. 

संशयास्पद 21 पैकी 10 उमेदवार अकोल्याचे
ज्युनिअर ऑफिसर व लेखनिकपदासाठी अनुक्रमे आठ हजार 649 व सहा हजार 308 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. त्यापैकी दोन हजार 15 उमेदवार दोन्ही पदांच्या परीक्षेला हजर होते. त्या सर्वांच्या दोन्ही परीक्षांच्या लेखी परीक्षेतील गुणांचे अवलोकन केले असता, त्यांच्या दोन्ही परीक्षांच्या गुणांमध्ये शून्य ते दहा गुणांचा फरक दिसून येतो. यावरून दोन्ही पदांच्या परीक्षेची काठिण्य पातळी सारखीच असल्याचे दिसून येते. तथापि, अंतिम निवड यादीतील उमेदवारांपैकी संशयास्पद 21 उमेदवारांच्या बाबतीत मात्र दोन्ही पदांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये 15 ते 52 गुणांचा मोठा आक्षेपार्ह फरक दिसून येतो. त्या संशयास्पद 21 उमेदवारांपैकी 10 उमेदवार एकट्या अकोले तालुक्‍यातील आहेत, असे पथकाच्या निदर्शनास आले आहे. 

शैक्षणिक गुणवत्तेत मागे व बॅंकेत मात्र सरस
अंतिम निवड यादीत समावेश असलेल्या संशयास्पद उमेदवारांची दहावी, बारावी व इतर शैक्षणिक स्तरावरील कामगिरी तुलनेने साधारण असतानाही अंतिम निवड यादीत मात्र त्यांची निवड वरच्या गुणानुक्रमाने झाली आहे. ज्या उमेदवारांची शैक्षणिक स्तरावरील कामगिरी चांगली आहे, त्यांची निवड मात्र खालच्या गुणानुक्रमावर झालेली आहे किंवा त्यांना डावलण्यात आले. असा प्रकार बहुतांश उमेदवारांच्या बाबतीत झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे पथकाने अहवालात नमूद केले आहे. 

'ते' सात अनोळखी कोण, हे गुलदस्त्यातच
लेखी परीक्षेनंतर उशिरा परीक्षार्थींच्या गैरहजेरीत उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, स्कॅनिंग करताना सीसीटीव्ही व व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था ठेवली नाही. बॅंकेची सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असतानाही ती या वेळी जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली, ही बाब पथकाने अधोरेखित केली आहे. स्कॅनिंगही तब्बल आठ तासांनी उशिरा केले. स्कॅनिंग सुरू करण्यापूर्वी चालू असलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅनिंग करताना बंद करण्यात आले. स्कॅनिंगच्या कामात बॅंक व भरतीप्रक्रिया करणारी "नायबर' संस्था यांच्याशिवाय इतर सात अनोळखी व्यक्ती तेथे कार्यरत असल्याचे पथकाच्या तपासात पुढे आले. परंतु ते सात जण नेमके कोण होते, याचा बॅंक व नायबर संस्था हे दोघेही खुलासा करू शकले नाहीत. 

मुलाखतीला 468 जणांना पैकीच्या पैकी गुण
सात सदस्यांच्या मुलाखत पॅनेलचे अध्यक्ष बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, तर सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे होते. पॅनेलने सर्व पदांसाठी एकूण एक हजार 354 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक पॅनेल सदस्याने वैयक्तिक गुण दिले आहेत. त्याची सरासरी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 468 उमेदवारांना सर्वच सदस्यांनी आक्षेपार्हरीत्या पाचपैकी पाच गुण दिले आहेत. सर्व मुलाखत पॅनेल सदस्य एकाच वेळी ठरावीकच उमेदवारांना पाचपैकी पाच गुण देतात, ही बाब संशयास्पद असल्याचे निरीक्षक पथकाने व्यक्त केली आहे. ज्युनिअर ऑफिसरपदासाठी एकूण 236 उमेदवारांची निवड झाली असून, त्यापैकी 89 उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचपैकी पाच गुण आहेत. लिपिकपदासाठी निवड झालेल्या 159 पैकी 68 उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचपैकी पाच गुण आहेत. 

सात जणांकडून दोन मिनिटांत मुलाखतीचा प्रताप
मुलाखतीचे वेळापत्रक पाहता प्रत्येक दिवशी सरासरी 255 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. मुलाखतीसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सात असा वेळ गृहीत धरला. जेवण, चहा इत्यादीसाठी दोन तासांचा कालावधी वगळता एका दिवसात सरासरी 8 तास मुलाखत कार्यक्रम चालू होता असे म्हणता येते. आठ तासांची मिनिटे होतात 480. दिवसात 255 उमेदवारांच्या मुलाखती झाल्याचे रेकॉर्ड विचारात घेता एका उमेदवाराला मुलाखतीसाठी सरासरी एक मिनिट 88 सेकंदाचा म्हणजे दोन मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एवढ्या कमी वेळेत सात जणांच्या मुलाखत पॅनेलने उमेदवारांचे मूल्यमापन केल्याचे स्पष्ट होते. ही बाब मानवीदृष्ट्या शक्‍य नसल्याचे स्पष्ट मत पथकाने अहवालात मांडले आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्तरपत्रिकांची पडताळणी हवी
या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करता ठरावीक उमेदवारांच्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्ये परीक्षेनंतरच्या कालावधीत अनियमितपणे फेरफार करून त्यांचा निवड यादीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही भरती सदोष आहे. त्यामुळे या सर्व बाबींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी करून सर्व सदोष उमेदवारांवर शिक्कामोर्तब करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची पडताळणी करणे उचित ठरेल. त्यानुसार गुणवत्तावान उमेदवारांची अंतिम निवड यादी निश्‍चित करणे शक्‍य होईल, असे पथकाने अहवालात शेवटी म्हटले आहे. 

भरतीप्रक्रिया पारदर्शी व योग्यच : गायकर 
बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी मात्र भरतीप्रक्रिया पारदर्शी व योग्यच असल्याचा दावा 'सकाळ'शी बोलताना केला. ते म्हणाले, "नाबार्डने ठरवून दिलेल्या एजन्सीची आम्ही भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवड केली होती. नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करूनच भरती केली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. ही भरती पारदर्शी पद्धतीने करण्यात आली. नाशिक विभागाच्या सहनिबंधकांनी भरतीप्रक्रिया रद्द ठरविली आहे. त्यांचा आदेश बॅंकेला प्राप्त झाला आहे. तो लवकरच होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. मंडळाच्या निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही होईल.'' 

संबंधित लेख