Marathi Political News BJP Amit Shaha Karnataka | Sarkarnama

लिहून ठेवा, कर्नाटक आमच्याच ताब्यात येईल : अमित शहा यांचा विश्‍वास

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

त्रिपुरा व नागालॅंडमध्ये विजय मिळविल्यानंतर आता आम्ही कर्नाटकही ताब्यात घेणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकारांशी बोलताना नागपुरात केला.

नागपूर : त्रिपुरा व नागालॅंडमध्ये विजय मिळविल्यानंतर आता आम्ही कर्नाटकही ताब्यात घेणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकारांशी बोलताना नागपुरात केला.

आज दुपारी 12 वाजता अमित शहा यांचे दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रामनगरातील भक्ती बंगल्यात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी त्रिपुरा निवडणुकीतील विजयाबद्दल चर्चा केली. तसेच कर्नाटक निवडणुकीच्या व्युव्हरचनेबाबत चर्चा केली. यावेळी भाजपचे इतर कुणीही पदाधिकारी नव्हते. दोघांनी एकत्र भोजनही घेतले. यानंतर अमित शहा यांनी रविभवनात आराम केला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी निघताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''त्रिपुरा व नागालॅंडमधील विजय मिळविला आहे, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी काही नवीन व्यूहरचना आहे काय? असा सवाल केला असता ते म्हणाले, "तुम्ही आताच लिहून ठेवा, कर्नाटकमध्येही भाजपचीच सत्ता येईल.''

यानंतर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे रवाना झाले. यावेळी खासदार अजय संचेती, भाजपचे नागपूर शहराचे संघटनमंत्री भोजराज डुंबे, नगरसेवक चेतना टांक, भाजपच्या नागपूर शहर आघाडीचे अध्यक्ष किर्ती अजमेरा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, पूजा तिवारी आदी उपस्थित होते.
 

संबंधित लेख