काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्यासह 13 जणांवर गुन्हे दाखल

बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी आमदार ॲड. नातिकोद्दीन खतीब यांच्यासह 13 जणांविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशावरून बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्यासह 13 जणांवर गुन्हे दाखल

अकोला : बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी आमदार ॲड. नातिकोद्दीन खतीब यांच्यासह 13 जणांविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशावरून बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. 

बाळापूर येथील रहिवासी रामदास श्रीराम पराते यांनी बाळापूर पोलिसात बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारासंबंधी तक्रार केली होती. 'अॅड. नातिकोद्दीन खतिब व संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळापूर सहकारी पतसंस्था स्थापन केली. फिर्यादीसह इतर लोकांकडून आकर्षक व्याजदर व कर्जाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये ठेव म्हणूण पतसंस्थेत जमा ठेवले. ठेवीची मुदत संपूनही ठेवीदारांचे पैसे परत करण्यास संचालक मंडळाने टाळाटाळ केली. तसेच अनेकांना कर्ज दिल्याचे भासवून कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खोटे दस्ताऐवज सादर करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. इतरांनी विश्वासाने सोपविलेल्या रकमेचा संचालक मंडळाने अपहार केला,' अशी तक्रार बाळापूर पोलिसांत पराते यांनी केली होती. 

या प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार खतीब, उपाध्यक्ष शाम शेगोकार, रजीया बेगम नतीकोद्दीन खतीब, हमीदोद्दीन सै.जमीरोद्दीन, नंदकिशोर दामोदर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफीउद्दीन, गफ्फारजी रहेमानजी रंगारी, सै.मुजीबिर रहेमान सै. हबीब, निर्मला श्रीकृष्ण उमाळे, शे.महेबूब शे.हसन, शे.मुनीर शे.कबिर, शे.वजीर शे.इब्राहिम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संचालक मंडळातील गफ्फारजी रहेमानजी रंगारी व शे.मुनीर शे. कबीर या दोन संशयित आरोपींचा यापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2016 पासून तक्रार दाखल
बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार सुरू असून पतसंस्थेच्या अध्यक्षासह व्यवस्थापक व १२ जणांनी पतसंस्थेत तब्बल १३ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये ऑगष्ट २०१६ मध्ये दिलेल्या तक्रारीत करण्यात आला होता. बाळापूर येथील रहिवासी युसुफ खाँ दुले खाँ आणि अकबर खान मेराज खान या दोन व्यापाऱ्यांनी बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार संबंधाची तक्रार बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबीत होते.
दरम्यान ठेवीदारांनी अन्नत्याग आंदाेलनही केले होते.

बाळापूर पतसंस्थेत सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडेच आहे. मात्र, या विषयावर मी आज बोलणार नाही
- गणेश अणे, आर्थिक गुन्हे शाखा प्रमुख, अकोला
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com