Marathi Political News Ashish Deshmukh Congress Delhi Tour | Sarkarnama

आशिष देशमुखांची दिल्ली वारी : काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 मार्च 2018

गेल्या काही महिन्यांपासून आमदार आशिष देशमुख भाजपवर नाराज असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करीत आहेत. विदर्भाचा मुद्दा तसेच शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईवरून सरकारला लक्ष्य करीत आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सध्या ते दिल्लीला गेले असून केवळ काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

नागपूर : भाजपचे आमदार आशिष देशमुख सध्या दिल्लीत असून ते काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या दिल्लीवारीने ते माजी खासदार नाना पटोले यांच्या मार्गाने जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून आमदार आशिष देशमुख भाजपवर नाराज असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करीत आहेत. विदर्भाचा मुद्दा तसेच शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईवरून सरकारला लक्ष्य करीत आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सध्या ते दिल्लीला गेले असून केवळ काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वडील व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख आहेत. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाली नाही. परंतु पिता-पुत्रांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी भेट घेतली. आशिष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेशाचा पेच विधानसभा मतदारसंघावरून निर्माण झाला आहे. आशिष देशमुख सध्या नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. हा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा आहे. या मतदारसंघावरील दावा अनिल देशमुख सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. 

यामुळे आशिष देशमुखांनी आता सावनेरवर दावा केला आहे. रणजित देशमुख यांनी 1985 ते 1995 या काळात सावनेर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे सुनील केदार करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत सुनील केदार यांचे मतभेद आहेत. प्रदेशाध्यक्ष चव्हाण हटाव मोहिमेत सुनील केदार यांनी सतीश चतुर्वेदी यांना साथ दिली होती. अशोक चव्हाण यांनाही सुनील केदार यांना आव्हान देणारा नेता हवा आहे. तो आशिष देशमुखांच्या रुपाने मिळाला आहे. आशिष देशमुखांना काँग्रेसमध्ये घेऊन केदार यांच्या विरोधात उभे करण्याची खेळी प्रदेशाध्यक्षांकडून खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. 
 

संबंधित लेख