भाजपच्या गडात राष्ट्रवादी काँग्रेस वापरणार 'मराठा कार्ड' 

कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला 25 वर्षांपासून सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतातर लोकसभेत पाठविण्यासाठी काँग्रेसकडे चेहरासुद्धा नाही. अशा परिस्थितीत मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससोबत बदल करून भाजपच्या 'मराठा कार्ड' ला मराठा उमेदवाराच्या रूपानेच आव्हान देण्याची तयारी राष्‍ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा निर्णायक वळणावर असल्याने हे 'मराठा कार्ड' ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच उघड केले जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपच्या गडात राष्ट्रवादी काँग्रेस वापरणार 'मराठा कार्ड' 

अकोला : कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला 25 वर्षांपासून सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतातर लोकसभेत पाठविण्यासाठी काँग्रेसकडे चेहरासुद्धा नाही. अशा परिस्थितीत मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससोबत बदल करून भाजपच्या 'मराठा कार्ड' ला मराठा उमेदवाराच्या रूपानेच आव्हान देण्याची तयारी राष्‍ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा निर्णायक वळणावर असल्याने हे 'मराठा कार्ड' ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच उघड केले जाणार असल्याची माहिती आहे. 

अकोला लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघासह अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. अकोला, वाशीम हे दोन्ही जिल्हे एकत्र असतानापासून येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा प्रवेश झाल्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलू लागली. सर्वप्रथम काँग्रेसकडून हा मतदारसंघ राज्याचे विद्यमान कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भाजपला मिळून दिला. तेव्हापासून आतापर्यंत केवळ एकवेळा ॲड. प्रकाश आंबेडकर वगळता सातत्याने हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला. 

आता तर सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजपच्या ताब्यात आहेत. काँग्रेसला पंधरा वर्षांपासून येथे एकही आमदार निवडून आणता आला नाही. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्यासाठी या मतदारसंघातील सामाजिक स्थिती कायम अनुकूल राहिली आहे. त्यामुळे सातत्याने पंधरा वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखले. हे वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतापर्यंत यात यश आले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अकोल्यासह सातत्याने जेथे दोन्ही पक्षाचे उमेदवार पराभूत होत आहेत, त्या मतदारसंघाची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काँग्रेसकडे अकोल्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बुलडाणा जिल्ह्यात लोकसभेसाठी चेहरा नाही. त्यामुळे या मतदारसंघाची भविष्यात अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचाही विचार होऊ शकतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता अकोल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय धोत्रे या भाजपच्या मराठा उमेदवाराविरुद्ध 'मराठा कार्ड'च वापरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश समन्वयक रामेश्‍वर पवळ यांच्या माध्यमातून एका युवा नेत्याची थेट पक्षश्रेष्ठांसोबत चर्चाही झाली आहे. उमेदवारीचे आश्‍वासन मिळाल्यामुळे हा युवा नेता येत्या काही दिवसांमध्येच राष्ट्रवादीच्या गोटात दिसल्यास नवल वाटणार नाही. 

कार्यकर्त्यांची मोठी फळी
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून युवा चेहरा पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वर्षभरापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. या युवा नेत्यानेही जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांची ही ताकद आणि अकोल्यातील सामाजिक समीकरणात अगदी योग्य असा उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून शोधण्यात येत होता. ही शोध मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. 

विदर्भात राष्ट्रवादी रोवणार पाय
राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भातून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. वाशीम जिल्ह्यात असलेली एकमेव रिसोड नगर परिषदही राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेली. येथील नगराध्यक्षांसह काही सदस्य भाजपमध्ये गेले. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीला पाय रोवण्याची संधीच उरली नाही. यावर उपाय म्हणून राष्ट्रवादीने लोकाभिमूख चेहऱ्यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. 

'स्वाभिमानी'ची अडचण
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. ही आघाडी झाल्यास बुलढाणा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडावा लागेल. अशा परिस्थितीत मतदारसंघाच्या अदलाबदलीत अडचण येण्याची शक्यता आहे. अशा वेळी पर्याय म्हणून अमरावती मतदारसंघाचा विचार होऊ शकतो.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com