Marathi Political News Ajit Pawar Khadse Assembly | Sarkarnama

नाथाभाऊ व अजितदादांनी मिळून सरकारला पकडले कोंडीत; विधानसभेत नवा दोस्ताना

ब्रह्मा चट्टे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विधानसभेत आज जनावरांच्या लाळ्या खुरकत रोगावरच्या लसीसंदर्भातील विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नात सरकार चांगलेच अडचणीत सापडले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकारला कोंडीत पकडले. त्यामुळे विधानसभेत नाथाभाऊ व अजितदादांमध्ये नवा दोस्ताना दिसून आला. यामुळे यासंबधीची लक्षवेधी चर्चेसाठी राखून ठेवावी लागली

मुंबई : विधानसभेत आज जनावरांच्या लाळ्या खुरकत रोगावरच्या लसीसंदर्भातील विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नात सरकार चांगलेच अडचणीत सापडले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकारला कोंडीत पकडले. त्यामुळे विधानसभेत नाथाभाऊ व अजितदादांमध्ये नवा दोस्ताना दिसून आला. यामुळे यासंबधीची लक्षवेधी चर्चेसाठी राखून ठेवावी लागली.

आज विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील लाळ्या खुरकत रोगावरील लसीसंदर्भात लक्षवेधी सुचना मांडली. ही सुचना मांडताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ''राज्यातल्या सुमारे दोन कोटी 10 लाख जनावरांना लाळ्या खुरकत रोगाची लागण होवू नये, यासाठी राबवण्यात येणारी लसीकरण मोहिम गत वर्षभरापासून राबवण्यात आली नाही. ही बाब गंभीर आहे. मंत्र्यांना याबाबत केंद्रिय मंत्र्यांनीही समज दिली आहे." या लसीबाबत सहावेळा निवेदा काढण्याचं कारण काय आहे? एकाच कंपनीला लाभ द्यायचा आहे काय? असा सवाल विचारत विखे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. 

यावेळी पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर निवेदन करताना म्हणाले, ''होय हे सत्य आहे. हा प्रश्न गंभीर आहे. आयुक्त सचिवांचे ऐकत नाहीत. याबाबत मागील आधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याबाबत पुढे काहीही कार्यवाही झाली नसली तरीही एका महिन्यात कार्यवाही करू" 

त्यावर हरकत घेत भाजप एकनाथ खडसे म्हणाले, "हे प्रकरण गंभीर आहे. मंत्रीमहोदय उत्तर देत आहेत, त्यावरून गंभीरता लक्षात येते. सात वेळा निविदा काढून त्रुटी निघणे यावर संशय आहे. राज्यातील दोन कोटी आठ लाख 778 गायी म्हशींचे जीव धोक्यात आहेत. अनेकदा केंद्राकडे पत्रव्यवहार झाला. केंद्रिय मंत्र्यांनीही 20 हजार कोटींची नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दर सहा महिन्यांनी लसीकरण होणे आवश्यक असते. लसीकरण झाले नाही, तर पशूंची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सचिव आयुक्तांचे ऐकत नाही असं मंत्री सांगतात. 
मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात सांगूनही जर काम होत नसेल, तर राज्यात अधिकारी कुणाचं ऐकतात, असा प्रश्न आहे.'' आताच्या आता त्या आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करा, असा अग्रह एकनाथ खडसे यांनी केला.

यावर अर्जुन खोतकर म्हणाले, "दिरंगाई झाली हे खरे आहे. निष्काळजीपणा झाला त्यामुळे कारवाई होणार आहे. उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. आयुक्त उमाप यांना पाठीशी घातले जाणार नाही." एका महिन्याच्या आत कारवाईचा अहवाल दिला जाईल असे अश्वासन खोतकर यांनी दिले. त्यावर हरकत घेत अजित पवार म्हणाले, "मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याऱ्या अवलादी इथं आहेत. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी कोण करणार? तशी चौकशी करूच शकत नाही. नाथाभाऊ तुम्हीच सांगा कोण करणार चौकशी?"

त्यावर एकनाथ खडसे म्हणाले, "झोटिंगना नेमा!" यावर विधानसभेत एकच हास्यक्ल्लोळ झाला. न्यायालयीन समिती स्थापन करा अशी मागणी करत विरोधकांनी वेलमध्ये उतरत सरकारविरोधी घोषणा दिल्या. विरोधकाचा गोंधळ वाढत असल्याचे पाहुन अध्यक्षांनी मुख्यमंत्री नसल्याने ही लक्षवेधी राखून ठेवली.

संबंधित लेख