दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार धोंडेंनीही हाती घेतले कुदळ- फावडे 

आष्टी हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी तालुक्‍यातील 113 गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यासाठी करंजी व कासेवाडी येथे गावकऱ्यांनी श्रमदानाला नुकतीच सुरूवात केली.'साथी हाथ बढाना साथी रे...' म्हणत आष्टीचे भाजप आमदार भीमराव धोंडे यांनी देखील हातात कुदळ आणि फावडे घेत ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केले.
दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार धोंडेंनीही हाती घेतले कुदळ- फावडे 

आष्टी (जि. बीड) : आष्टी हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी तालुक्‍यातील 113 गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यासाठी करंजी व कासेवाडी येथे गावकऱ्यांनी श्रमदानाला नुकतीच सुरूवात केली. 'साथी हाथ बढाना साथी रे...' म्हणत आष्टीचे भाजप आमदार भीमराव धोंडे यांनी देखील हातात कुदळ आणि फावडे घेत ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केले. 

मातीने भरलेले घमेले डोक्‍यावर घेऊन त्यांनी मी ही तुमच्या सोबत असल्याची प्रचिती आमदार धोंडे यांनी गावकऱ्यांना दिली. तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. अभिजित पाटील, गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर हे श्रमदानात सहभागी झाले. कुस्ती हा पिंड असलेले भीमराव धोंडे तसे नियमित व्यायाम करणारे हट्टेकट्टे पहिलवानच. त्यामुळे या भागातून पैलवान तयार व्हावेत यासाठी त्यांनी तालुक्‍यात अत्याधुनिक व्यायामशाळाही उभारली. आष्टी ते दिल्ली बाराशे किलोमिटर आणि आष्टी ते मुंबई चारशे किलोमिटरचा मोर्चा काढणाऱ्या आमदार धोंडे यांनी गेल्या वर्षी मतदारसंघाचा दौरा देखील पायीच केला होता. 

दररोज सकाळी दंडबैठका, पुल अप्स, जोरबैठका, सुर्यनमस्कार घालूनच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. कधीकाळी कुस्तीचे फड गाजविणाऱ्या आमदार भीमराव धोंडे यांनी त्याच ताकदीने गुरुवारी हातात खोरे - फावडे घेत माती खणली आणि डोक्‍यावरून वाहिली देखील. दुष्काळावर मात करण्यासाठी मतदारसंघातील लोक पुढाकार घेत असताना आमदार तरी मागे कसे राहतील? धोंडे यांच्या श्रमदानाने उपस्थितांमध्ये आणखीणच उत्साह संचारला. 

आष्टी - पाटोदा - शिरुर कासार या मतदार संघाचे काँग्रेस पक्षाकडून ते सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी समांतर काँग्रेस पक्षाचीही स्थापना केली होती. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहील्यानंतर मागच्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला. विधानसभेची उमेदवारी मिळवून विजयही मिळवला. राजकारणात पारंगत असलेले भीमराव धोंडे हे उत्तम कुस्तीपटूही आहेत हे विशेष. त्यांनी गाव शिवारापासून ते राज्यपातळीवर कुस्त्यांचे फड गाजवले आहेत. साठी पार असलेल्या धोंडे यांनी नियमित व्यायामाच्या जोरावर सुदृढ शरीरयष्टी कमावलेली आहे. 

दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे पाण्याचे मोल धोंडे चांगलेच जाणतात. युती सरकारच्या काळात कुकडीच्या पाणी योजनेसाठी आष्टी ते मुंबई चारशे किलोमीटर अंतर पायी कापत त्यांनी मोर्चा काढला होता. त्याचा परिणाम योजनेला गती मिळण्यात झाला. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटरकप स्पर्धेत गावे सहभागी झाल्याचे कळताच भीमराव धोंडे यांनी श्रमदानासाठी धाव घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com