Marathi Politcial News Nagpur Bjp Narayan Rane Sancheti | Sarkarnama

नारायण राणेंमुळे अजय संचेतींची राज्यसभेची वाट बिकट?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 मार्च 2018

भाजपच्या कोट्यात राज्यसभेच्या तीन जागा आहेत. त्यापैकी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. उरलेल्या एका जागेसाठी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केलेले व एनडीएमध्ये सामील झालेल्या नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे बोलले जात आहे.

नागपूर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे घाटत असल्याने नागपुरातील भाजपचे नेते खासदार अजय संचेती यांची दुसऱ्यांदा राज्यसभेत जाण्याची वाट अधिक बिकट झाली आहे.

येत्या 23 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून या संबंधीची अधिसूचना आज जारी झाली. येत्या 12 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अजय संचेती यांची राज्यसभेत वर्णी लागली होती. झारखंडमध्ये भाजपची सत्ता आणण्यात संचेती यांनी मोठी भूमिका बजावल्यामुळे संचेती यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. आता पुन्हा संचेती यांना संधी मिळेल काय? याबाबत मात्र साशंकता आहे.

भाजपच्या कोट्यात राज्यसभेच्या तीन जागा आहेत. त्यापैकी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. उरलेल्या एका जागेसाठी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केलेले व एनडीएमध्ये सामील झालेल्या नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे बोलले जात आहे. राणे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यास अजय संचेती यांच्या उमेदवारीवर संक्रांत येईल, हे स्पष्ट आहे. संचेती कुटुंब संघ परिवाराशी संबंधित असून भाजपच्या 'फायनान्सर'पैकी एक आहेत. त्यांचे नातेवाईक चैनसुख संचेती बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील भाजपचे आमदार आहेत. अजय संचेती यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यास आमदार चैनसुख संचेती यांना मंत्रीपद देण्यात येईल, असे बोलले जात आहे.

संबंधित लेख