Marathi Artists Unhappy on Vinod Tawde | Sarkarnama

विनोद तावडे कलाकारांनाही झाले नकोसे!

सुशांत सांगवे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई विद्यापीठाच्या निकालांवरुन विद्यार्थी नाराज, वाढत्या शैक्षणिक शुल्कामुळे राज्यातले पालकमंत्री नाराज, विविध कारणांमुळे शिक्षक-प्राध्यापक नाराज.....राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांबद्दल असलेल्या नाराजीत भर पडली आहे ती कलावंतांच्या नाराजीची! '...असा सांस्कृतिक मंत्री नकोच,' अशी मागणी अभिनेते आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी पुण्यात केली आहे. विनोद तावडे यांच्याकडचे सांस्कृतिक खाते काढून घेऊन या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुणे : मुंबई विद्यापीठाच्या निकालांवरुन विद्यार्थी नाराज, वाढत्या शैक्षणिक शुल्कामुळे राज्यातले पालकमंत्री नाराज, विविध कारणांमुळे शिक्षक-प्राध्यापक नाराज.....राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांबद्दल असलेल्या नाराजीत भर पडली आहे ती कलावंतांच्या नाराजीची! '...असा सांस्कृतिक मंत्री नकोच,' अशी मागणी अभिनेते आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी पुण्यात केली आहे. विनोद तावडे यांच्याकडचे सांस्कृतिक खाते काढून घेऊन या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाटक, चित्रपट, साहित्य क्षेत्रातील अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात वारंवार मागण्या करूनही सांस्कृतिक विभाग त्याची दखल घेत नाही. तर दुसरीकडे, सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे नाटक-चित्रपट व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य निर्माते यांनी एकत्र येऊन दबाव गट स्थापन केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मोहन जोशी यांनी तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रसाद कांबळी यांनीही तावडे यांच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.

आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोशी म्हणाले, ''सध्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे वेगवेगळी खाती आहेत. त्यामुळे त्यांना सांस्कृतिक विभागाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसावा किंवा ते या क्षेत्राला किरकोळ समजत असावेत. लेखक-कलावंतांना ते वेळच देत नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रमांना हजर राहत नाहीत. आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीत. स्वत:च्या घोषणाही पूर्ण करत नाहीत,''

''साहित्य-नाट्य संमेलनाचे अनुदान दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जमा केले जाईल, अशी घोषणा तावडे यांनी घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात केली होती. ती प्रत्यक्षात उतरली नाही. नाट्य संमेलनाचे अनुदान तर ते कधीच वेळेवर देत नाहीत. नाट्य संमेलन संपल्यानंतर देतात, तेही आयोजकांच्या हातात. हे कुठले धोरण? संमेलनाला मिळणारे अनुदानही तुटपुंजे आहे. काळानुसार यात वाढ व्हायला हवी. आम्ही अनेक वर्षांपासून अनुदान दुप्पट करा म्हणत आहोत. 'जीएसटी'मुळे नाटकांचे तिकीट दर वाढले आहेत. प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे. असे असेल तर नाट्य संस्था कशा जगतील? अशा अनेक अडचणी आमच्यासमोर आहेत. त्या वारंवार निदर्शनास आणून दिल्या तरी त्या सोडविण्यासंदर्भात अनास्था दाखवली जाते,'' अशीही टीका जोशी यांनी केली.

सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्‍न सोडविण्याऐवजी 'या क्षेत्रातील प्रमुख संस्थांनी एकमेकांतील भांडणे सोडवून आमच्याकडे एकत्र यावे', असे सांगितले जाते; पण आमच्यात कुठलेही भांडण नाही. हे दाखवण्यासाठी आज आम्ही सर्व संस्थांचे पदाधिकारी एकत्र आलो आहोत. सध्याचे सांस्कृतिक मंत्री ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत, तशी वागणूक पूर्वीच्या मंत्र्यांनी दिली नाही आणि अशी अनास्थाही दाखवली नाही. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील अशा अनेक मान्यवरांनी हे खाते उत्तमरित्या सांभाळून आपला ठसा उमटवला आहे. मनोहर जोशी यांनीही मुख्यमंत्री असताना भरीव मदत केली आहे. अशी कलेची जाण सध्याच्या मंत्र्यांमध्ये दिसत नाही, अशी टीका करत मोहन जोशी यांनी या सर्व बाबी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या कानावर घालणार आहोत. त्यासाठी वेळही मागितली आहे, असेही सांगितले.

कलावंतांच्या प्रमुख मागण्या
- साहित्य-नाट्य संमेलनाचे अनुदान दुप्पट करा
- मराठी चित्रपटांवरील करमणूक कर काढून टाका
- विधान परिषदेवर लेखक-कलावंतांना घ्या
- मराठी चित्रपटांचे अनुदान पाचवरून 25 कोटी करा
- अभिजात भाषा, मराठी भाषा धोरण लागू करा

 

संबंधित लेख