Maratha Youths From Nashik Going To Kerala for Help | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

डॉस्कीसायक्‍लीनच्या लाख गोळ्यांसह मराठा कार्यकर्ते निघाले केरळला 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

गेले काही दिवस सकल मराठा समाज व त्यांचे कार्यकर्ते म्हणजे आरक्षणाचे आंदोलन, रास्ता रोको, बंद, तोडफोड यांसारख्या बातम्या व घटनांत सतत चर्चेत होते. त्याच्या सकारात्मक, नकारात्मक चर्चा आणि प्रतिक्रीया उमटत होत्या. मात्र, या प्रतिक्रीयांना छेद देण्याचा संकल्प नाशिकच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

नाशिक : मराठा समाजाचे कार्यकर्ते, युवक आरक्षणासाठी बंद, आंदोलन, धरणे अन्‌ आंदोलनात महिनाभर झळकले. आपत्तीच्या काळातही आम्ही मागे नाही याचा प्रत्यय येथील युवकांनी दिला आहे. येथील मराठा उद्योग फोरमचे सल्लागार डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. औषध व साहित्यासह ते सहकाऱ्यांसह उद्या (ता.23) केरळला दाखल होत आहेत. प्रत्यक्ष अंदाज घेऊन अन्य सहकाऱ्यांसह पुढील नियोजन ते करणार आहेत. 

यासंदर्भात डॉ. गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत मराठा हायस्कूल कट्टातर्फे हा निर्णय घेतला. केरळच्या अर्नाकुलम येथील पुरग्रस्तांच्या कॅंपचे समन्वयक डॉ. मॅथ्यू यांच्या संपर्क साधल्यावर औषधे, वैद्यकीय साहित्य, शुध्द पाण्याचा तुटवडा असल्याने दहा हजार टन ब्लिचींग किलो पावडरची गरज कळविली. यामध्ये त्यांना विविध संस्थांनीही प्रतिसाद दिला. नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल व शहर पोलिसांनी त्यांना साह्य केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी मदत केली. यातुन एक लाख डॉक्‍सीसायक्‍लीनच्या गोळ्या, वीस हजार मास्क, वीस हजार हातमौजे हे साहित्य घेऊन ते उद्या (ता.23) कोची येथे पोहोचतील. 

स्थानिक परिवहन कार्यालयाचे लोक त्यांना एर्नाकुलम कॅम्पवर नेतील. पुढील तीन दिवस ते तिथे काम करतील. त्यानंतर पुढील गरजेनुसार अन्य साहित्य व मदतीसह पुढचे पथक जाईल असे त्यांनी सांगीतले. योगेश आरोटे, शीतल भामरे, आरटीओ अधिकारी सचिन बोधले, संजय ससाने, संदीप निमसे, अनील केदार, राहूल कदम, धनराज गोसावी, प्रशांत शिंदे, अमित थोरात यांनी त्यात मदत केली आहे. 

गेले काही दिवस सकल मराठा समाज व त्यांचे कार्यकर्ते म्हणजे आरक्षणाचे आंदोलन, रास्ता रोको, बंद, तोडफोड यांसारख्या बातम्या व घटनांत सतत चर्चेत होते. त्याच्या सकारात्मक, नकारात्मक चर्चा आणि प्रतिक्रीया उमटत होत्या. मात्र, या प्रतिक्रीयांना छेद देण्याचा संकल्प नाशिकच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांचा हा एक वेगळा पैलू चर्चेचा विषय ठरला आहे. 

संबंधित लेख