maratha samaj party blog | Sarkarnama

मराठा समाजाला खरंच स्वतंत्र पक्षाची गरज आहे का ? 

प्रकाश पाटील 
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्र क्रांती सेनेची वाटचाल ही "रासप', "आरपीआय'प्रमाणे असेल का ? तो कुठल्या पक्षाची तळी उचलून धरतो. तो एखाद्या पक्षाबरोबर आघाडी करतो की स्वबळावर लढतो ? हे पहावे लागेल. असे असले तरी पक्षाचा विस्तार करणे, तळागाळात पक्ष पोचविणे सोपे नाही. त्यासाठी काही वर्षे खस्ता खाव्या लागतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या व्होट बॅंकेला धक्का देण्यासाठी "नवी क्रांती' राज्यात जन्माला आलेली तर नाही ? असा प्रश्‍नही यानिमित्ताने राजकीय विश्‍लेषकांना पडला तर आश्‍चर्य वाटू नये ! 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे कंकण बांधले. बलाढ्य अशा मोगलांच्या अन्यायाविरोधात आवाज उठविला. मराठी साम्राज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे शिवाजीराजे एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रातच नव्हे देशभर वंदिले जातात. शत्रू विरुद्ध लढा देताना त्यांनी तत्कालीन विजापुरची आदिलशाही, नगरची निजामशाही आणि मुख्यतः मुघल साम्राज्याशी लढा देत मराठा साम्राज्य उभे केले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला. 

शिवरायांचा सर्वसमावेशक हा आदर्श घेऊनच आपल्या राज्यकर्त्यांनी कारभार सुरू ठेवला. शिवराय जातीने मराठा होते पण, मराठेपण त्यांनी कधी मिरविले नाही. मोगलांविरोधात लढत असताना त्यांचे विश्वासू सहकारी, अंगरक्षकही मुस्लिम होते. त्यामुळे कधी जातीपातीचे राजकारण शिवशाहीत मूळ धरू शकले नाही हे मुळात लक्षात घेणे गरजचे आहे. हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र क्रांती सेना नावाचा नवा पक्ष. 

गेल्या वर्षी " एक मराठा, लाख मराठा' ची हाक देत राज्यातील मराठा समाज कधी नव्हे तो भगव्या झेंड्याखाली संघटीत झाला होता. आरक्षण आणि इतर शैक्षणिक सवलती मिळाव्यात या मागणीसाठी समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. त्याची सरकारी दरबारी दखलही घेण्यात आली. हे मोर्चे काढताना समाजातील कोणत्याही नेत्याला व्यासपीठावर स्थान नव्हते. उलट त्यांना मोर्चाच्या सर्वात शेवटी ठेवण्यात आले. समाज संघटित झाल्याने सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. 

समाजाने असेच संघटित राहण्याची जणू शपथच घेतली. मात्र कोणीही मराठा समाजाच्या नावाने पक्ष काढणार नाही किंवा समाजाच्या नावावर स्वार्थ साधणार नाही असा ठरावही झाला होता. असे असताना मराठा समाजासाठी वेगळा पक्ष स्थापन करण्याची काही गरज होती का ? 

महाराष्ट्र क्रांती सेना नावात मराठा नसले तरी या पक्षाचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आपला पक्ष यापुढे काम करेल, असे स्पष्ट केले आहे. खरेतर लोकशाहीत कोणीही पक्ष किंवा संघटना स्थापन करू शकतो. त्याला घटनेने दिलेला तो अधिकारच असतो. हे खरे असले तरी एखाद्या समाजाची मागणी घेऊन जन्माला आलेले पक्ष कधीच महाराष्ट्रात मोठे झालेले नाहीत . मग, तो धनगर समाजाचा रासप असेल किंवा दलितांचा "आरपीआय' किंवा इतर कुठल्या तरी जातींचे पक्ष असतील. 

मराठा समाजाकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास आपल्या असे लक्षात येईल की, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत हा समाज (आदिवासी किंवा दुर्गम भाग सोडले तर) पसरला आहे. असे कुठले गाव नाही की तेथे मराठा नाही. गावची सोसायटी, गावचा पाटील, सरपंच, झेडपी सदस्य, आमदार, खासदार ते मुख्यमंत्र्यांपर्यंत या समाजातील नेत्यांचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. 

महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत अठरा मुख्यमंत्री लाभले. त्यापैकी नऊ मुख्यमंत्री मराठा होते. तसे पहायला गेले तर मराठा समाजाचे नेते सर्वच पक्षात दिसून येतात. यापूर्वी मात्र तसे नव्हते कॉंग्रेसमध्येच या समाजाचे वर्चस्व होते. आज सर्व पक्षातील मराठा समाजातील आमदारांचे प्रमाण सुमारे 150 इतके आहे. राजकारणाबरोबर सहकार आणि शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व देखील या समाजातील नेत्यांकडे आहे . 

मराठा समाजात आजपर्यंत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण असे मुख्यमंत्री होऊन गेले. या समाजाने नेहमीच सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन कॉंग्रेस पक्षात काम केले. सर्वसमावेशकता हाच त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. 

राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रावरही या समाजातील नेत्यांचा प्रभाव राहिला आहे. गावगाड्यातही केवळ मराठा समाजाला बरोबर न घेता सर्वानाच बरोबर घेऊन साखर कारखाना असेल किंवा बॅंका, शिक्षण संस्था चालविण्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळे केवळ मराठा समाजाला घेऊनच कोणत्याही नेत्याला राजकारण करता आले नाही किंवा भविष्यातही तसे तो करू शकत नाही. 

आज शेती उद्धवस्त झाल्याने मराठा समाज कधी नव्हे तो संकटात सापडला आहे. हे खरे. दुष्काळ ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवावर उठला आहे. मुलामुलींची लग्ने होत नाही. शेतमालाला भाव नाही. एका कुटुंबातील दहाबारा एकर जी शेती होती तिचे तुकडे पडले. प्रत्येकाला ती एकरात किंवा गुंठ्यात वाट्याला आली. नोकरी नाही. हाताला काम नाही अशी चारही बाजूने संकटे घोंगावत आल्याने हा समाज खडबडून जागा झाला. आजपर्यंत सरकारने किंवा मराठा नेत्यांनी या समाजासाठी काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही. पण, स्पर्धेच्या युगात सर्वच क्षेत्राला जसे चढउतार पाहवे लागले तसे सहकाराचेही झाले. 

या समाजातील मुलंमुली विविध क्षेत्रात चमक दाखवित आहेत. सर्वत्र निराशेचे चित्र आहे असेही नव्हे. पण, समाजाच्या वर्तमानकाळात ज्या म्हणून काही समस्या आहेत त्याकडे हा समाज संघटित होऊन न्याय मागतो आहे. सरकार दरबारी काही निर्णय फडणवीस सरकारने घेतले आहेत त्याचे स्वागतच केले पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरला आहे. तो भविष्यात मार्गी लागू शकतो. 

समाजाच्या काही ढिगभर मागण्या नाहीत. पक्षविरहित मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आग्रही आहे. त्यामुळे त्याला स्वतंत्र पक्षाची गरज आहे असे वाटत नाही. ज्या पक्षात मराठा नेते आहेत त्यांनी मराठा समाजासाठी प्रयत्न केले तरी चित्र वेगळे दिसू शकते. 

आज देशात कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सात पक्ष राष्ट्रीय तर शिवसेनेसह 51 प्रादेशिक पक्ष आहेत. तसेच इतर शेकडो म्हणजे सातशे ते आठशे पक्ष देशात आहेत. त्यामध्ये आणखी महाराष्ट्र क्रांती पक्षाची भर पडली इतकेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील पक्षांकडे पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल की कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. त्यानंतर मनसे, रासप, आरपीआय (आठवलेंसह अनेक गट), भारिप-बहुजन महासंघ तसेच समाजवादी पक्ष, बसप,"एमआयएम'ही आहेत. 

ज्या पक्षांना समाजातील सर्वघटकांचा पाठिंबा असतो असेच पक्ष सत्तेवर येतात. केवळ एका समाजाचे किंवा जातीचे पक्ष कधीच सत्तेवर येऊ शकत नाही किंवा ते बाळसे धरू शकत नाही. ते व्होट बॅंकेचे राजकारण करून फायदे पदरात पाडून घेतात. समाजाचा किती फायदा होतो सांगता येत नाही ? सत्ताधारी किंवा प्रस्थापित पक्षांबरोबर समझोता करतात. जातींच्या पक्षासाठी लक्ष्मणरेषा ठरलेली असते. ही रेषा ते कधीच ओलांडू शकत नाहीत. 

"रासप'कडे किंवा "आरपीआय'कडे पाहिले तर असे लक्षात येईल की या पक्षाचे महादेव जानकर, रामदास आठवले हे मंत्री आहेत. पण, तेही पुढच्या दाराने विधिमंडळात गेलेले नाहीत. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याशिवाय ते निवडूनही येऊ शकत नाहीत. त्यांच्या पक्षाचे कुठे आमदारही नाहीत. 

रासपचे राहुल कुल आहेत पण, ते त्यांच्या ताकदीवर निवडून आले आहेत. एकाच जातीच्या मतांवर कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही. जातींच्या किंवा समाजाच्या मागणीसाठी असे पक्ष जन्म घेतात पण, सर्व जातीधर्मांचा पक्ष म्हणून त्यांची कधीच ओळख होत नाही. समाजातील सर्व घटकांवर ते प्रभाव पाडू शकत नाहीत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख