Maratha reservation : keshavrao-chaudhari-commits-suicide-his-wife-reaches-agitation-spot- | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी पतीची आत्महत्या; पत्नीचा क्रांती चौकात ठिय्या

अतुल पाटील
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या केशव चाैधरी यांच्या कुटुंबियांना  मुख्यमंत्री सहायता निधीमधून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय कुटुंबातील एका सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नाेकरी देण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी चाैधरी कुटुंबियांना दिले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशवराव  साहेबराव चौधरी (४५) यांनी सोमवारी (ता. १३) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या पत्नीने  क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश  केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असताना  अख्खे चौधरी कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देऊन बसले होते . 

क्रांती चौकात मराठा आंदोलनासाठी गेल्या  २२ दिवसांपासून मंडप टाकण्यात आलेला असून तेथे ठिय्या आंदोलन सुरु आहे .  केशव यांच्या आत्महत्येने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातच अख्खे कुटुंब क्रांती चौकात येऊन बसले. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत कुटुंबातील सदस्य आक्रोश करत होते.  समन्वयकांनी त्यांची समजूत काढल्यानंतर कुटुंबीय घरी गेले.
 

केशवराव  चौधरी हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातीलच शेलुद चारठा येथील होते. कुटुंबियांचे वीस वर्षांपासून शहरात वास्तव्य आहे. सध्या ते न्यू हनुमान नगरात राहत होते. केशव हे अशिक्षित असल्याने मातीकाम करायचे, तर त्यांची पत्नी धुणी-भांडी करून कुटुंब चालवायच्या. 

यातच दोघांनी मुलांना शिक्षण दिले. मुलगा रवीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले, मात्र पैशांअभावी तो मिस्त्री काम करु लागला. तर मुलगी दिव्याने छत्रपती महाविद्यालयात बीकॉमसाठी प्रवेश घेतला आहे. शिक्षण थांबू नये म्हणून सीएच्या हाताखाली शिकाऊ उमेदवार म्हणून ती काम करायची. 

पैशांअभावी मुलांना व्यवसाय नोकरी करावी लागते, याचे दुःख केशव यांना होते. ते नेहमी पत्नी जवळ बोलूनही दाखवत होते. त्यामुळेच ते मराठा क्रांती मोर्चा तर्फे मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात हिरिरीने सहभागी व्हायचे. 

"माझी बहीण धुणीभांडी करण्यासाठी, रवी मिस्त्री कामासाठी, तर दिव्या नोकरीसाठी बाहेर पडली होती. भाऊजी एकटेच घरी होते. रवि दुपारी सव्वाबारा वाजता घरी आला तर, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना घाटीत  दाखल करण्यात आले." असे केशवराव चौधरी यांचे  मेहुणे राजू ठाले यांनी सांगितले.

संबंधित लेख