Maratha morcha should have discussion with Govt : Khedekar | Sarkarnama

मराठा समाजाने सरकारशी चर्चा करायला हरकत काय? : पुरूषोत्तम खेडेकर 

योगेश कुटे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सकल मराठा समाजातर्फे येत्या नऊ आॅगस्ट रोजी मुंबईत क्रांती मोर्चोचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चोच्या निमित्ताने समाजातील प्रश्न ऐरणीवर येत आहेत. याबाबत विविध पैलूंवरील मुलाखतींची मालिका `सरकारनामा`मध्ये देत आहोत. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांची ही मुलाखत.

पुणे :  "मराठा क्रांती मोर्चांमुळे मराठा समाजात भावनिक एकता साधली गेली आहे. ही एकता टिकवून पुढे जायचे असेल तर सरकारशी चर्चा करायला हवी. सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले आणि स्वतः मुख्यमंत्री या चर्चेत सहभागी होणार असतील सकल मराठा समाजाने सरकारशी वाटाघाटी कराव्यात,`` अशी सूचना मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना केली. 

मुंबईमध्ये येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर "सरकारनामा'ने त्यांच्याशी संवाद साधला.

 
खेडेकर म्हणाले,""मराठा क्रांती मोर्चाने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यातील बहुतांश मागण्या पूर्ण केल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. "जे देणं शक्‍य होत ते देऊन झालेलं आहे,' असे वक्‍तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात आहे. कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकारने मदतीची भूमिका घेतली आहे.``

 ``आणखी काही मागण्या असतील तर त्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी महसूलमंत्र्यांनी दाखवली आहे. चळवळ किंवा आंदोलनाच्या विशिष्ट टप्प्यावर सरकारशी चर्चा करावीच लागते. या पूर्वी विलासरराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत वेळोवेळी चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे भाजप सरकारशी चर्चा करण्यास हरकत नसावी. मात्र त्याबबत सरकारने निमंत्रण द्यावे आणि ही चर्चा मुख्यमंत्र्यांशी करावी,'' असे खेडेकर यांनी सुचविले 

"चर्चेत सरकार दोन पावले पुढे येत असतील, वाटाघाटी होऊ शकतात. मात्र या वाटाघाटींना तोंड फुटणे गरजेचे आहे. ही चर्चा मराठा समाजातर्फे कोणी करावी, काय मागण्या कराव्यात, यावर मतभेद आहेत. सरकारशी चर्चा करणारे लगेच "फुटीर' ठरतात. हे मुद्दे आपापसांतील चर्चेने सुटू शकतात,'' असेही त्यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या मोर्चांचे नक्की परिणाम काय झाला, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""समाजाची भावनिक एकता या मोर्चांमुळे साध्य झाली आहे. मराठा समाजाचे प्रश्‍न रस्त्यावर शांतपणे उतरून लोकांनी मांडले. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल इतरांमध्ये जो विखार होता; तो कमी झाला आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतिगृहे बांधण्याचे आश्‍वासन सरकारने दिले आहे. बार्टीच्या धर्तीवर "सारथी' ही संस्था सरकारने स्थापन करण्याचे ठरविले आहे. राज्य मागासवर्ग आयोगावर पूर्ण दहा सदस्य सरकारने नेमले आहेत. आता हे सारे झाल्यानंतर मराठा समाजातील तरुणांनी यात अभ्यासासाठी उतरले पाहिजे. समाजशास्त्र, मानव्यवंशशास्त्र, इतिहास आदींचा अभ्यास करून आपले मुद्दे मांडण्याची क्षमता मराठा तरुणांत निर्माण झाली पाहिजे.'' 

मुंबईतील मोर्चाचे फलित काय, यावर खेडेकर यांनी सांगितले की गेल्या जुलैपासून मराठा समाजाने राज्याच्या विविध भागांत मोर्चे सुरू केले होते. त्याला प्रतिसादही प्रचंड मिळाला होता. या सर्व मोर्चांचा समारोप म्हणून मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. तो काढला नसता तर त्यावर टीका झाली असती. त्यामुळे संयोजकांनी नऊ ऑगस्ट ही तारीख मुंबईतील मोर्चासाठी ठरवली. या मोर्चाला लाक्षणिक अर्थाने कोणतेही नेतृत्त्व नाही. समाजानेच ते हाती घेतले आहे. मोर्चाचे स्थळ, वेळ आणि तारीख कळवल्यानंतर समाज स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाला. समाजाच्या या सहभागामुळे मुंबईतील मोर्चाही महत्त्वाचा आहे. 

वाचा आणखी बातम्या

मराठा आरक्षणासाठी जि.प. सदस्य देणार आमदारांना निवेदन 

-राणे म्हणाले, मराठा मोर्चाचा फायदा घेऊ नका! 

-मराठा मोर्चा निघायलाच हवा

संबंधित लेख