maratha morcha in pune under women leadership | Sarkarnama

पुण्यात सकल मराठा समाजाचा इशारा मोर्चा; महिलांनी केले नेतृ्त्त्व

उमेश शेळके
रविवार, 29 जुलै 2018

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतलेच पाहिजे, शेतकऱ्यांना हमी दिला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी "मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस चले जाव' अशा घोषणा देत मागण्या मान्य न झाल्यास नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता डेक्कन जिमखान्यावरील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि जिजाऊ वंदना गाऊन मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात समाजाचे तरूण आणि तरूणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गळ्यात भगवी मफलर, हातात भगवे झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले.

शिस्तीत निघालेला हा मोर्चा जंगली महाराज रस्त्याने एसएसपीएमएस महाविद्यालयाजवळ आला. "कोण म्हणते देणार न्याय, घेतल्याशिवाय राहणार नाही,' "आरक्षण आमच्या हक्काचे', "मागे घ्या मागे आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या', "जय जिजाऊ, जय शिवराय,' अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर जंगली महाराज रस्त्यावरील सर्व वाहतुक आणि दुकाने पोलीसांकडून बंद करण्यात आली होती. मोर्चा दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 

मोर्चा एसएसपीएमएस महाविद्यालय येथे पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पूजा झोळे आणि अर्चना भोर यांनी मागण्यांचे निवदेन वाचून दाखविले. मागण्या मान्य न झाल्यास नऊ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. आंदोलनदरम्यान मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे यांच्यासह तिघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली. 

संबंधित लेख