Maratha kranti Morcha workers were not involved in Waluj Industry attack : Vinod Patil | Sarkarnama

उद्योगांवरील हल्यात विनाकारण आम्हाला गोवण्याचा प्रयत्न : विनोद पाटील 

सरकारनामा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

या प्रकरणात ज्या आरोपींना अटक झाली आहे, त्यात मराठा क्रांती मोर्चाचा एकही कार्यकर्ता नाही. आम्हाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

- विनोद पाटील

औरंगाबाद : " महाराष्ट्र बंदच्या दिवशी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली. या प्रकरणात ज्या आरोपींना अटक झाली आहे, त्यात मराठा क्रांती मोर्चाचा एकही कार्यकर्ता नाही. आम्हाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे ," असा  आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (ता.10) पत्रकार परिषदेत केला. तसेच या तोडफोडीची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची मागणी देखील त्यांनी केली. 

काल महाराष्ट्र बंद दरम्यान वाळुजमधील अनेक कंपन्यांवर आंदोलकांनी हल्ला चढवून प्रचंड नासधूस केली होती. यावर उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उद्योग हलवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

 विनोद पाटील यावेळी बोलताना पुढे म्हणाले ," वाळूज औद्योगिक वसाहतीतील कारखान्यावर झालेल्या हल्ल्यांचे आम्हालाही दुःख आहे . राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले तरी समाज एवढा मोठा आहे की सर्वांना नोकऱ्या   मिळणार नाहीत . उद्योगात मोठा रोजगार आहे . त्यामुळे अशा प्रकारांचा आम्ही विरोध करतो . तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीतकारखान्यात शिरून  आंदोलन करण्याचे कारणच काय ? आमचे आंदोलन रस्त्यावर होते . शहरात होते . "

''  उद्योगांवर झालेल्या हल्याशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही . या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये आमचा एकही कार्यकर्ता नाही .  तसेच या हल्ल्याची  सीआयडीकडून चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. अन्य ठिकाणच्या आंदोलनात ज्या मराठा तरुणांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे ," असेही शेवटी विनोद पाटील म्हणाले . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख