Maratha Kranti Morcha leaders give CM Fadnavis a deadline of 7 August | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी ७ ऑगस्टपर्यंत लेखी आश्वासन दिले तरच परळीतील आंदोलन मागे :  मराठा क्रांती मोर्चा

दत्ता देशमुख
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी परळी येथे सुरु असलेले ठिय्या आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरुच आहे. गुरुवारी राज्यभरातील २६ जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची परळीत बैठक झाली.

बीड : मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, शासनाची होऊ घातलेली मेगा भरती थांबवावी, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन मंत्रीमंडळाच्या ठरावासह केलेल्या परळीतल्या आंदोलनात लेखी दिले तरच ठिय्या आंदोलन मागे घेतले जाईल. यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सरकारला सात ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. यानंतर राज्यभर ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. 

दरम्यान, मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावेत आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही गुरुवारी करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी यासाठी परळी येथे ता. १८ जुलै रोजी राज्यातला पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघून ठिय्या आंदोलन सुरु झाले. सोळाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. आंदोलनाची धग राज्यभर पसरली आहे. जिल्ह्यातही विविध मार्गांनी आंदोलने सुरुच आहेत. दरम्यान, गुरुवारी राज्यातील २६ जिल्ह्यांच्या समन्वयकांनी परळीत हजेरी लावली. समन्वयकांच्या बैठकीनंतर विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

आंदोलनातील महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आरक्षणासाठी बलीदान देणाऱ्यांच्या कुटूंबियांना शासनाने ठोस मदत करावी, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घ्यावा तसेच मंत्रीमंडळाच्या ठरावासोबत निर्णय परळी येथील आंदोलनस्थळी दिला तरच परळीतील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येईल असेही समन्वयकांच्या बैठकीत ठरले.

बैठकीनंतर   माध्यमांना ही माहिती देण्यात आली . यावेळी आबासाहेब पाटील,अमित घाडगे, सुनील नागणे, विवेकानंद बाबर,आप्पासाहेब कुठेकर, रमेश केरे पाटील, शाम पाटील, सुभाष जावळे, कल्याणी पाटील, गोरख शिंदे, राम मस्के, ज्ञानेश्वर कवडे, अर्जुन साळुंखे, महेश डोंगरे, हनुमंत पाटील, सचिन पाटील, नानासाहेब जावळे, संजय सावंत, अशोक हिंगे, बापू शिरसाठ, विशाल कदम, बळीराम पाटील, राज पाटील संदीप पाटील, राजन मोरे, भानुदास जाधव, ज्योती सपाटे, बबन सुद्रीक उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी चोरांबा (ता. धारुर) येथे रास्ता रोको आंदोलन झाले. तर, माजलगाव येथील ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते.

संबंधित लेख