maratha kranti morcha code of conduct in baramati | Sarkarnama

बारामतीतील आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता 

उमेश घोंगडे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

बारामतीतील मोर्चेकऱ्यांनी जाहीर केलेली ही आचारसहिंता बारामती शहर व तालुक्‍यात कौतुकाचा विषय झाली आहे. राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनात या प्रकारच्या अचारसहिंतेची अमंलबाजवणी झाल्यास आंदोलनाची बदनामी होणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे : कोणत्याही जातीच्या संदर्भाने कॉमेंट नको, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा सहभाग अथवा मार्गदर्शन नको, संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले पाहिजे यासारख्या मार्गदर्शक सूचना बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी मोर्चेकऱ्यांना दिल्या आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करताना काय अचारसंहिता असावी, आंदोलकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, या विषयी मार्गदर्शन करणारी आचारसंहिता बारामतीत बोर्डवर लावण्यात आली असून दोन ऑगस्टपासून बारामतीत शांततेत ठिय्या आंदोलन सुरू आहे. येत्या आठ ऑगस्टपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालणार आहे. 

आंदोलनादरम्यान होत असलेला हिंसाचार व त्यातून आंदोलनाची होणारी बदनामी लक्षात घेता आंदोलनासाठी घालण्यात आलेली आचारसंहिता राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांना मार्गदर्शक आहे. आंदोलकांनी आंदोलनाच्या ठिकाणी येताना शिस्तीत यावे, आंदोलनाच्या ठिकाणी थांबून राहावे, शहरात इतरत्र फिरू नये, आंदोलनस्थळी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ त्याची दखल घेऊन संयोजकांना कळवा. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले पाहिजे याची काळजी घ्या, या प्रकारची आचारसहिंता घालण्यात आली आहे. 

आंदोलनाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. मात्र स्वत:चे जेवण घरून घेऊन यावे. आंदोलनादरम्यान इतर समाज बांधवांचा लेखी किंवा तोंडी पाठिंबा घेण्यात येणार नाही, अशा काही सूचनांचा समावेश आहे.

संबंधित लेख