Maratha Business Forum Formed in Nashik | Sarkarnama

मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार 'नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार' 

संपत देवगिरे 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मात्र, आरक्षण मिळाल्याने प्रश्‍न सुटतील का? यावर व्यक्तीनिहाय भिन्न मते आहेत. येथील युवकांनी मात्र यावर तोडगा म्हणुन समाजातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी 'मराठा उद्योजक फोरम' सुरु केला आहे.

नाशिक : राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मात्र, आरक्षण मिळाल्याने प्रश्‍न सुटतील का? यावर व्यक्तीनिहाय भिन्न मते आहेत. येथील युवकांनी मात्र यावर तोडगा म्हणुन समाजातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी 'मराठा उद्योजक फोरम' सुरु केला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्याला पाठबळ दिले. या उपक्रमाचे सगळ्यांनीच स्वागत केले आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले विविध नेते, युवकांनी एकत्र येत यावर तोडगा शोधला आहे. विशाल बनकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, भारतीय जनता पक्षाचे डॉ. प्रशांत पाटील, निवृत्त पोलिस उपायुक्त चंद्रकांत बनकर, बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या फोरमचा पहिला कार्यक्रम नामवंत उद्योजक तसेच भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे उपसंचालक अतुल दवंगे, मानसोपचार तज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत 'मविप्र'च्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला. हा फोरम उद्योग, व्यवसाय, प्रगत शेतीसाठी साह्य करणार आहे.

याबाबत पुढाकार घेणारे विशाल बनकर, खासदार हेमंत गोडसे, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, ''आरक्षण मिळाले तरी प्रश्‍न लगेच सुटणार नाहीत. कारण प्रत्येक समाजात अस्वस्थता आहे. युवकांना नोकरी, रोजगार हवा आहे. त्यासाठी फोरमच्या माध्यमातुन आम्ही पर्याय उपलब्ध करुन देणार आहोत. त्यासाठी अनेक युवकांनी केलेल्या सुचनेनुसार फोरम स्थापन झाला आहे."

या नव्या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक झाले. पहिल्याच कार्यक्रमात सहाशेहून अधिक युवकांनी नोंदणी केली. योगेश नाटकर- पाटील, महेश आडके, विशाल कोशिरे, दिनेश पाटील, भाऊसाहेब राजोळे, पवन पवार, किशोर जाधव, शिल्पा वाघ, पूजा जाधव, विश्वास वाघ, समाधान भारतीय, राजेश भोसले आदींनी त्याचे संयोजन केले आहे. त्यामुळे राज्यभर हा उपक्रम चर्चेत आला आहे. 

आरक्षण मिळाले तरी प्रश्‍न सुटणार नाही. सगळ्याच समाजांतील अशांतता आहे. त्यामुळे स्वतःला पात्र, सर्वोत्तम करण्यावर भर द्यावा. उद्योग सुरु करुन स्वतः व समाजालाही रोजगार निर्माण करणे व त्यासाठी मराठा उद्योजक फोरम हा चांगला पर्याय आहे -  हनुमंतराव गायकवाड, अध्यक्ष, भारत विकास ग्रुप, पुणे. 
 
समाजातील युवकांना उद्योगाचा दाखविण्यासाठी फोरम स्थापन केला आहे - विशाल बनकर, संयोजक, मराठा उद्योजक फोरम 

संबंधित लेख