9 ऑगस्टच्या आंदोलनात सहभाग नाही; नरेंद्र पाटील 

9 ऑगस्टच्या आंदोलनात सहभाग नाही; नरेंद्र पाटील 

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी येत्या 9 ऑगस्टला राज्यभरात होणाऱ्या ठोक आंदोलनातून नवी मुंबई सकल मराठा समाजाने माघार घेतली आहे. 25 जुलैला झालेल्या आंदोलनादरम्यान कोपरखैरणेतील हिंसाचारामुळे निर्माण झालेली सामजिक तेढ दूर करण्यासाठी आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे समन्वयकांतर्फे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

तसेच 25 जुलैच्या हिंसाचारादरम्यान गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 
येत्या 9 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व समन्वयकांच्या एपीएमएसी मार्केटमधील माथाडी भवनात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत 25 जुलैच्या आंदोलनातील तृटींची कारणमिमांसा करण्यात आली. 

सकल मराठा समाजाच्या राज्य समन्वयकांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही कोपरखैरणेत झालेल्या हिंसाचारात आपण कुठे कमी पडलो याची सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चाचपणी केली असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 25 जुलैच्या आंदोलनामुळे नेहमी शांत असलेल्या नवी मुंबईचे वातावरण खराब झाले आहे. हे वातावरण आणखिन खराब होऊ नये, येथील स्थानिक आगरी व कोळी समाजा आणि मराठा समाजातील दरी वाढू नये म्हणून येत्या 9 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होणार नाही असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. 

तसेच बैठकीत ठरलेल्या ठरावाची प्रत नवी मुंबई पोलिसांना देऊन आपण आंदोलन करणार नसल्याची खात्री त्यांना देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला सकल मराठा समाजाचे नवी मुंबई समन्वयक अंकुश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com