Maratha agitation workers and marriage at agitation square | Sarkarnama

आंदाेलकांनी केले सहकार्य अन आंदाेलनस्थळी पार पडले शुभमंगल !

संजय माजरे 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

चौकातच मंगलाष्टके झाली आणि आंदोलकांसह सर्वांनी  वधू-वरावर अक्षदा टाकल्या . वधूवरांनी  परस्परांना हार घातले . त्यानंतर वधूवरांनी आंदोलकां बरोबर सहभाग नोंदवत घोषणा दिल्या . 

गांधीग्राम ( जि . अकोला ) : मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली असतानाच, अकाेट शहरातील शिवाजी चाैकात मात्र आंदाेलना दरम्यानच   गुरुवारी शुभमंगल  पार पडले. या विवाहाला आंदाेलनकर्त्यांनीही सहकार्य केले. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता.९) बंदची हाक देण्यात आली. या बंदला अकाेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

गांधीग्राम येथील पांडुरंग अढाऊ यांचा मुलगा अभिमन्यू आणि देऊळगाव येथील हरिदास गावंडे यांची कन्या तेजस्विनी यांच्या विवाहाची तिथीदेखील आजच हाेती. गांधीग्रामपासून अकाेटला जाण्यास निघालेल्या अढाऊ मंडळीला आंदाेलनाची धाकधूक हाेती. परंतु आंदाेलकांनी त्यांना न अडविता जाऊ दिले. 

अकाेटला पाेहचल्यानंतर शिवाजी चाैकात आंदाेलनासाठी माेठ्या प्रमाणात जमाव हाेता. रस्ता रोको सुरु होता . आंदोलकांनी अढाऊ यांचे वऱ्हाड घेऊन चाललेली वाहने अडविली . तेंव्हा पांडुरंग अढाऊ यांनी आंदोलकांना सांगितले की, आमचा आंदोलनास पाठिंबा आहे . यावर आंदोलकांनी वधूपक्षाचे हरिदास गावंडे यांच्याशी संपर्क साधला . दोन्ही बाजूचे वऱहाडी  तेथे जमले .

  वर - वधू पक्षाच्या मंडळींनी आंदोलकांना  विनंती केली. त्यावर आंदोलकांनी आम्ही विवाहाला अडथळा आणणार नाही उलट आंदोलन स्थळी विवाह लावून देतो असे सांगितले .  आंदोलनाच्या चौकातच लग्नाची तयारी सर्वांनी केली . सर्वांच्या संमतीने अक्षदाचा कार्यक्रम आंदोलनाच्या चौकातच करण्याचे ठरले. आंदोलकांनी विवाहासाठी लागणाऱ्या गोष्टींची  तयारी केली . 

चौकातच मंगलाष्टके झाली आणि आंदोलकांसह सर्वांनी  वधू-वरावर अक्षदा टाकल्या . वधूवरांनी  परस्परांना हार घातले . त्यानंतर वधूवरांनी आंदोलकां बरोबर सहभाग नोंदवत घोषणा दिल्या . 

त्यानंतर वऱ्हाड  पूर्वनियोजित विवाहस्थळी म्हणजे मार्केट कमिटीच्या सभागृहात आले . तेथे सप्तपदी आणि इतर धार्मिक विधी पार पडले .  आंदाेलना दरम्यान पार पडलेल्या या शुभविवाहाची चर्चा दिवसभर शहरात हाेती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख