Maratha agitation in Pimpri | Sarkarnama

पिंपरीत मराठा समाजाचा खासदार-आमदारांच्या घरासमोर घंटानाद 

संदीप घिसे 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सकल मराठा मार्चाच्या वतीने बुधवारी सकाळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार आणि महेश लांडगे यांच्या निवासस्थानी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

पिंपरी : सकल मराठा मार्चाच्या वतीने बुधवारी सकाळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार आणि महेश लांडगे यांच्या निवासस्थानी घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदारांना निवेदन दिले. 

यावेळी मारुती भापकर, जीवन बोऱ्हाडे, नकुल भोईर, राजेंद्र देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास खासदार अमर साबळे यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते घरी नसल्याने त्यांच्या मुलीने मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली. ते देखील घरी नसल्याने त्यांच्या मुलाने निवेदन स्वीकारले. 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन स्वतः निवेदन स्वीकारले. त्यावेळी भापकर यांनी आमदारांना राजीनामा देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले, ''राजीनाम्याला घाबरणारा आमदार मी नाही. मात्र, राजीनाम्याने प्रश्‍न सुटणार नाही. मराठा समाजाच्या मागण्यासाठी आपण विधानसभेत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.'' त्यानंतर खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्या कार्यालय प्रमुखांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

आंदोलनाचा समारोप भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानासमोर झाला. यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना लांडगे म्हणाले, ''मराठा समाजासाठी शासन ज्या काही योजना आखणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाचा त्याचा पाठपुरावा करणार आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या विषयाकरिता पाठपुरावा करणार आहे.'' 

संबंधित लेख