Maratha agitation has cornered politicians | Sarkarnama

मराठा आंदोलनाने झाली  नेत्यांची कोंडी

अरूण जैन
शुक्रवार, 27 जुलै 2018

50 कार्यकर्ते जमविताना दमछाक होणारे नेते हजारोंच्या संख्येने एकत्रित येत असलेल्या समाजबांधवासोबत एकत्र येण्यास  का घाबरतात?

बुलडाणा  : छोट्या छोट्या कारणाने रस्त्यावर  येणा-या व प्रसिद्धीची एकही संधी  न सोडणा-या नेत्यांची मराठा आंदोलनाने चांगलीच कोंडी झाली आहे. समाजाचा प्रश्न असतानाही मतांचे गणित बिघडू नये या भितीने हे प्रस्थापित नेते गप्प आहेत.

मराठा क्रांती मोर्चांनी समाजात वेगळा आदर्श घालवून दिला होता. लाखोंच्या मोर्चात एकही तक्रार नव्हती मात्र एवढे करूनही मागण्या मान्य होत नसल्यामुळे या आंदोलनाला वेगळे स्वरूप येऊ पहात आहे. 

मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच याही आंदोलनात माणसापेक्षा समाज महत्वाचा या भूमिकेतून कुणाचेही नाव पुढे न करता सकल मराठा समाज या नावाखाली एकत्रिकरण होत आहे. अशावेळी एखादा नेता सहानुभूती मिळविण्यासाठी आलाच तर त्याचे कसे हाल होतात हे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अनुभवातून लोकांनी पाहिले आहे.

 समाज भडकला तर भल्या भल्यांना पळता भुई थोडी होईल. या शिवाय मराठा आंदोलनात पुढे राहिलो तर इतर समाजांच्या मतांचा फटका बसेल काय? ही मतलबी भितीदेखिल नेत्यांना सतावत असेल. अन्यथा 50 कार्यकर्ते जमविताना दमछाक होणारे नेते हजारोंच्या संख्येने एकत्रित येत असलेल्या समाजबांधवासोबत एकत्र येण्यास घाबरतात कि आपली राजकिय सोय पाहतात, हा खरा प्रश्न आहे.

संबंधित लेख