Marath morcha leaders snub Ashish Shelar | Sarkarnama

`आशिष शेलारांची मराठा मोर्चात चमकोगिरी' 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबईत निघालेल्या मराठा मोर्चातील काही मंडळी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या विरोधात उघड भूमिका घेत आहेत. त्यातूनच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना त्याचा फटका बसला. मोर्चेकऱ्यांनी त्यांना आझाद मैदानापासून हुसकावून लावले. अर्थात शेलार यांनी त्याचा इन्कार केला.

मुंबई : मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना आज मराठा मोर्चेकऱ्यांचा रोष पत्करावा लागला. मोर्चा सुरू होण्यापूर्वी आझाद मैदान येथे मोर्चेकऱ्यांची भेट घेण्यासाठी शेलार सकाळी तेथे पोचले होते. मात्र मोर्चेकऱ्यांनी त्यांना अटकाव केला. शेलार हे चमकोगिरी करण्यासाठी येथे आले होते, असा आरोप मराठा मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला. 

या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शेलार हे आमदार आहेत. त्यांनी विधिमंडळात मराठा समाजाचे प्रश्‍न मांडायला हवे होते. मात्र ते टाळून ते केवळ आपला चेहरा दाखविण्यासाठी येथे आले. त्यांची ही चमकोगिरी लक्षात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना घोषणा देऊन जायला भाग पाडले. मुंबईत या आधी दोन वेळा मोर्चा काढण्याचे प्रयत्न झाले होते. या दोन्ही मोर्चांच्या वेळी समाजात फूट पाडण्याचे काम शेलार यांनी केले, असा आरोप या वेळी करण्यात आला. 

या आरोपाविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी खोदून विचारले असता त्यांनी सांगितले की त्या वेळी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार होती. या निवडणुकीत मराठा मोर्चाचा फटका बसू नये, यासाठी शेलारांनी खेळी खेळल्या आणि मोर्चा रद्द करण्यास भाग पाडला. शेलारांनी आपल्या नेत्यांची हुजरेगिरी करणयासाठी मराठा समाजात फूट पाडत आहेत. मात्र समाज आता जागा झाला असून, त्याचा दणका शेलारांसह त्यांच्या नेत्यांनाही बसेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. 

शेलार यांनी मात्र आपल्याला मोर्चाच्या ठिकाणाहून हुसकावून लावले असल्याच्या घटनेचा इन्कार केला. मला कोणी रोखले नाही किंवा कोणी अडविले नाही. विधानभवनात मराठा मोर्चाविषयी ठराव येणार असल्याने मोर्चाच्या ठिकाणाहून मी निघून आलो, असा दावा त्यांनी केला. 

संबंधित लेख