Marahta Agitation in Front of Shivsena MLA's Residence in Nashik | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार कदमांविरोधात शिवसेनेचीच घोषणाबाजी 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 31 जुलै 2018

आज सकाळी दहाला ओझर (ता. निफाड) येथील शॉपींग मॉलमधील आमदार अनिल कदम यांच्या संपर्क कार्यालयापुढे सकल मराठा समाजातर्फे धरण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यांसह राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या.

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या ओझर येथील संपर्क कार्यालयापुढे धरणे आंदोलन झाले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यात सहभागी होऊन घोषणा देत होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिवसेनेच्या आमदाराविरोधात शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. यावेळी आमदार कदम यांनी 'राजीनामा देण्यापेक्षा विधीमंडळात हा प्रश्‍न जोरकसपणे मांडेन' असे आश्‍वासन दिले. 

आज सकाळी दहाला ओझर (ता. निफाड) येथील शॉपींग मॉलमधील आमदार अनिल कदम यांच्या संपर्क कार्यालयापुढे सकल मराठा समाजातर्फे धरण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यांसह राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या.

''राज्य सरकार या प्रश्‍नावर उदासीन आहे. दोन वर्षात अठ्ठावन्न मोर्चे शांततेत निघाले. मात्र, सरकारने त्याची काहीही दखल घेतली नाही. आधी न्यायमूर्ती बापट आयोग नेमला. त्यानंतर न्यायमूर्ती सराफ, नारायण राणे, न्यायमूर्ती म्हसे आणि आता न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमण्यात आला. मात्र पदरात काहीच पडलेले नाही. मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार या विषयावर गंभीर नाही हे स्पष्ट होते,'' असे यावेळी गणेश कदम यांनी आंदोलकांच्या वतीने सांगितले.

यावेळी आमदार कदम यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन स्विकारले. मी हा प्रश्‍न विधीमंडळात जोरकसपणे मांडीन. राजीनामा दिल्याने काहीच निष्पन्न होणार नाही. या प्रश्‍नाचा पाठपुरावा करीन. त्यानंतरही प्रश्‍न सुटला नाही तर नक्की राजीनामा देईन असे सांगितले. त्यानंतर आंदोलन संपले. यावेळी शिवसेनेचे गटनेते प्रकाश महाले, राजू देसले, तुषार जगताप, उमेश शिंदे, माधवी पाटील, पुजा धुमाळ, मनोरमा पाटील, भुषण शिलेदार, सागर शेजवळ, सागर शेजवळ, शिवाजी मोरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख