दिवस 'कॅबिनेट'चा....मंत्रालयातील लगबगीचा

कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात उसळलेल्या गर्दीचा तेथील बूट पॉलिशवाल्यांनाही फायदा होतो. मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी खादीधारी राजकीय मंडळी आपले बूटही तेथेच चकाचक करून घेताना दिसतात. कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात गर्दीची परंपरा आजही कायम राहीली आहे.
दिवस 'कॅबिनेट'चा....मंत्रालयातील लगबगीचा

मुंबई : आठवड्यातील सहा दिवसाच्या कामकाजामध्ये मंगळवारचा अपवाद वगळता इतर दिवशी मंत्रालयात फारशी गर्दी नसते. कॅबिनेटचा अपवाद वगळता अन्य दिवशी मंत्रालयाचा कारभार मंत्र्याचे 'ओएस' व 'पीएस'च हाताळत असल्याने मंत्रालयाचे त्या दिवशी खर्‍या अर्थांने सचिवालय बनलेले पहावयास मिळते. मंगळवारी कॅबिनेट असल्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर माणसांचा महासागर पहावयास मिळाला.

सकाळी १० वाजल्यापासून अंगणवाडी सेविकांची एकीकडे गर्दी, तर कोठे पती-पत्नी एकत्रिकरणासाठी मंत्र्यांच्या शिफारशीकरता ग्रामीण भागातून आलेली शिक्षकांची काही जोडपीही सकाळपासून प्रवेशद्वारावर ताटकळत होती. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील शासकीय अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने मंत्रालयात आल्याचे पास काढण्यासाठीच्या गर्दीवरून पहावयास मिळाले.

एकीकडे सर्वसामान्य माणूस मंत्रालयात आपल्या कामासाठी आल्यावर रांगेत उभा राहून पास काढण्यात व्यग्र होता तर दुसरीकडे आमदारांसमवेत त्यांचे कार्यकर्ते जेजे या मुख्य प्रवेशद्वारावरून मंत्रालयात पोलिसांसमक्ष बिनधास्तपणे शिरकाव करताना पहावयास मिळाले. सोबत असणारे आमदार पोलिसांना 'ते आपले कार्यकर्ते आहेत, सोडा त्यांना'; असे सांगत होते. या कार्यकर्त्यांची कोणत्याही प्रकारे झाडाझडती न होता त्यांना थेट आमदारांसमवेत मंत्रालयात कॅबिनेटच्या दिवशी प्रवेश मिळत होता.

एक अंध महाविद्यालयीन युवक गावावरून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता.  त्याने भेटीचा पास काढून आत सोडण्यासाठी पोलिसांना विनवणी करत होता, परंतु पोलिस त्याला दोन वाजल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळेल असे सांगत होते. यावर अंध युवक 'मला मुख्यमंत्र्यांचे  दालन शोधायलाच दोन तास जातात, त्या वेळेत मुख्यमंत्री निघून गेले तर मला हेलपाटा पडेल,' अशी विनवणी करूनही पोलिस त्याला प्रवेश देत नव्हते. दुसरीकडे बाजूलाच आमदारांसमवेत त्यांचे कार्यकर्ते खुलेआमपणे  ये-जा करत होते.

मुख्यमंत्र्यांचा ताफा ११.४०ला मंत्रालयात  शिरल्यावर  पांढर्‍या कपड्यातील राजकारण्यांची वर्दळ वाढीला लागली. 'मुख्यमंत्री गेलेत आतमध्ये, लवकर या' अशी फोनाफोनी प्रवेशद्वारावरील पांढर्‍या कपड्यातील खादीधारी माणसांकडून सुरू झाली होती. कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात उसळलेल्या गर्दीचा तेथील बूट पॉलिशवाल्यांनाही फायदा होतो. मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी  खादीधारी राजकीय मंडळी आपले बूटही तेथेच चकाचक करून घेताना दिसतात. कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात  गर्दीची परंपरा  आजही  कायम राहीली आहे. कॅबिनेट असल्यावरच  ताण असतो, इतर दिवशी आम्ही थोडे फार निवांत असतो अशी पोलिसांकडून दिली जाणारी माहिती अन्य दिवशी  मंत्रालयात नसणारी गर्दी सांगत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com