manse hallabol | Sarkarnama

मनसेचा हल्लाबोल : अधिकाऱ्याची गाढवावरुन धिंड ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकाराच्या सुमारास हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली.

कऱ्हाड (सातारा) : मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकाराच्या सुमारास हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 40 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यात महिलांचाही समावेश आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यात मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज वाटली आहेत. त्यात महिलांनी घेतलेल्या कर्ज वसूलीचा कंपनीने तगादा लावला आहे. कंपनीचे अधिकारी कर्ज वसूलीसाठी घरी येऊन आरेरावी करतात, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी केला आहे. मलकापूरच्या कार्यालयात आज सकाळी मनसेचे मनोज माळी व कार्यकर्ते महिलांचा जमाव घेऊन गेले. कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. खुर्च्या उचलून टेबलावर फेकल्या. खिडक्‍यांच्या काचा व लॅपटॉप फोडून इतर सामानाची मोडतोड केली. अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयातून ओढत बाहेर आणले. रस्त्यावर आणून गाढवावर बसवून त्यांची धिंड काढली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी जोरजोरात घोषणा दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून अधिकाऱ्यांची सुटका केली. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांसह महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

 

संबंधित लेख