manjush gund challenges ram shinde | Sarkarnama

मंजुषा गुंड देणार मंत्री राम शिंदेंना आव्हान! 

मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू : मंजुषा गुंड 
सरकारनामाशी बोलताना मंजुषा गुंड म्हणाल्या, राष्ट्रवादी कॉग्रेच्या माध्यमातून महिला आघाडीवर काम करण्याची नव्याने संधी मिळाली, याचा उपयोग करून जिल्हाभर महिलांच्या कल्याणासाठी काम करणार आहे. आगामी विधानसभेबाबत पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. 
 

नगर : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या माजी अध्याक्षा मंजुषा गुंड यांची निवड करून पक्षाने पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधातील मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. ही निवड म्हणजे मंजुषा गुंड यांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून लढण्यास "ग्रीन सिग्नल' मानला जात आहे. 

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. तत्कालिन अध्यक्षा माधुरी लोंढे यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीस बंडखोरी करून तिसऱ्या आघाडीतून उमेदवारी केली. त्यावेळी त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर हे पद रिक्त राहिले. लोंढे याही कर्जत तालुक्‍यातील. या पदासाठी मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉगेसच्या युवती सेलच्या अमृता कोळपकर या इच्छुक होत्या. मागील वेळी महिला जिल्हाध्यक्षपदाचे पद कर्जत तालुक्‍यात असताना पुन्हा त्याच तालुक्‍यात पद पक्षाने दिले आहे. 

धस यांचा पत्ता कट, गुंड यांचे आव्हान 
कर्जत-जामखेड मतदार संघातून सुरेश धस इच्छुक होते. ते शेजारील बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी कर्जत जामखेडवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांचे मोठे आव्हान मंत्री राम शिंदेंसमोर होते. मात्र ते बीडमधील राजकीय समीकरणांमुळे भाजपच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याने त्यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. त्यामुळे आता गुंड परिवारातून सक्षम पर्याय राष्ट्रवादी देईल, अशी चिन्हे आहे. 

पती, सासऱ्यांचा जनसंपर्क 
मंजुषा गुंड यांचे सासरे बापुसाहेब गुंड यांना मानणारा तालुक्‍यात मोठा वर्ग आहे. अंबालिका कारखाना पूर्वी जगदंबा नावाने होता. त्या कारखान्याचे अध्यक्षपद बापुसाहेब यांनी भुषविले आहे. त्यांच्या काळात गुंड यांचे काम सर्वश्रूत आहे. पती राजेंद्र गुंड हे कुळधरण गणातून पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यांचाही संपर्क मोठा आहे. त्यामुळे सासरे व पतीच्या जनसंपर्काचा फायदा मंजुषा गुंड यांना होणार आहे. 

मंजुषा गुंड यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना जिल्हाभर जनसंपर्क वाढविला. महिलांच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेत त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी विशेष काम केले. त्याचप्रमाणे कर्जत-जामखेड मतदार संघात विविध योजना राबवून आपले कर्तृत्त्व सिद्ध केले. त्याचा फायदा आगामी काळात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी होणार आहे. तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला, विशेषतः शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याचाही फायदा या लढतीला होऊ शकेल. 

 

संबंधित लेख