The Mango tree in Mhalgi Prabodhini is silent today | Sarkarnama

म्हाळगी प्रबोधिनीतील  ते आंब्याचे झाडही आज निश्चल  झाले !

संदीप पंडित 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

भारतरत्न ,माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या निधनानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हळहळली . प्रबोधिनीतील  ते आंब्याचे झाडही आज निश्चल  झाले  .

भाईंदर : भारतरत्न ,माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या निधनानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हळहळली . प्रबोधिनीतील  ते आंब्याचे झाडही आज निश्चल  झाले  . अटलजी देशाचे पंतप्रधान असताना प्रबोधिनीत आले होते . तेंव्हा त्यांच्या हस्ते प्रबोधिनीत एक आंब्याचे रोप लावण्यात आले होते . 

वाजपेयी यांचे भाईंदर येथील केशव सृष्टी आणि राम भाऊ म्हाळगी प्रबोधिनी याचे एक वेगळे भावनिक नाते होते . या प्रबोधिनीत त्यांनी अनेकदा भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून प्रेरणा दिली . त्यांच्या अमोघ आणि ओघवती वक्तृत्वाने कार्यकर्ते कसे भारावून जात याच्या आठवणी आज अनेकजण बोलून दाखवीत होते .

 अटलजी  कवी होते . पत्रकार होते . राजकीय नेतेही होते .  यापलीकडे एक संवेदनशील माणूस आणि निसर्गावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जात .  त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रभोधिनी मध्ये आम्रवृक्षाचे झाड लावले होते.या झाडाचा आता डेरेदार वृक्ष झाला आहे . या आम्रवृक्षाला गोड  आणि रसाळ  फळे काही वर्षांपासून लागत आहेत .

प्रबोधिनीतर्फे या झाडाचे रसाळ आंबे अटलजींनी भेट देण्यात आली होती .  आम्रवृक्षाच्या  या रसाळ आंब्याबाबत स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रबोधिनीकडे लेखी अभिप्राय पाठवला होता .अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अनेकजण त्यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाजवळ जाऊन आले पण आज ते आंब्याचे झाडही स्तब्ध आणि निश्चल झालेले होते . 

 
      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख