mangaldas bandal try for mns ticket | Sarkarnama

शिरूर लोकसभेला मनसेकडून मंगलदास बांदल? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

या भागात आमदार शरद सोनवणे यांचे काम चालू आहे, तसेच तुम्ही हो म्हणा, शिरूरचा खासदारही तुमचाच होईल. 
-मंगलदास बांदल 

ओतूर (पुणे):  शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मनसेकडून उमेदवारीचे संकेत देताना आमदार शरद सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. 

ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात आमदार सोनवणे यांनी स्वतः 75 लाख रुपये खर्चून उभारलेल्या माजी आमदार कै. श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) स्टेडियमचे उद्‌घाटन व लोकार्पणप्रसंगी ठाकरे बोलत होते. 

या स्टेडिअमची भव्यता पाहता महाराष्ट्रात असा आखाडा असेल, असे वाटत नाही. मी असे आमदार पाहिले आहेत की, ज्यांनी लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले, सोनवणे यांनी मात्र लोकांसाठी खिशातला पैसा बाहेर काढला. असे जर 288 आमदार मिळाले, तर मी काय महाराष्ट्र घडवीन, हे तुम्ही पहाल,'' असे ठाकरे म्हणाले. बांदल यांच्या मागणीबाबत सोनवणे यांच्याबरोबर विचारविनीमय करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी बांदल, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, पिंपरीचे महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, "विघ्नहर'चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, संचालक धनंजय डुंबरे, श्री कपर्दिकेश्वर देव- धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, वसंत पानसरे, महेंद्र पानसरे, वैभव तांबे, सरपंच बाळासाहेब घुले व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था व ओतूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार सोनवणे यांची पेढ्यांची तुला करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते (कै.) पोपटराव मारुती पानसरे यांना जाहीर झालेला मरणोत्तर ओतूरभूषण पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. ओतूरच्या सुपुत्री, खेड तालुक्‍याच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनाही ओतूरभूषण पुरस्कार देऊन राज ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सचिन घोलप व आर्किटेक्‍ट अरविंद वैद्य यांचाही सन्मान करण्यात आला. 
सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले. आभार धनंजय डुंबरे यांनी मानले. 

 

संबंधित लेख