mane and raju shetty with ncp | Sarkarnama

राजू शेट्टीच्या संभाव्य उमेदवारीने राष्ट्रवादीच्या माने गटाचा बंडाचा झेंडा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : अखिल भारतीय महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने यांच्या गटाने बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात उपरा उमेदवार देवू नये म्हणजेच स्वाभिमानीचे खासदार राजू शेटटी यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून उमेदवारी देवू नये, यासाठी हे बंड होईल. माने गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीला "जय महाराष्ट्र' करण्याचा इशारा निवेदिता माने यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी दिला. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत निवेदिता माने यांचा राजू शेटटी यांनी पराभव केला. त्यामुळे मागील म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि माने यांना डावलून कॉंग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांना आघाडीने उमेदवारी जाहीर केली. तसेच आवाडे यांच्या प्रचाराचे आदेश माने यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले. निवेदिता माने किंवा धैर्यशील माने यांना विधानपरिषदेत आमदार करण्याच्या बोलीवर ही तडजोड करण्यात आली. मात्र माने यांना आता सोयीस्कररित्या डावलण्यात आले. उलट खासदार शेटटी व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची जवळीक वाढली असून या आघाडीची उमेदवारी खासदार शेटटी यांना निश्‍चित मानली जात आहे. 

लोकसभा निवडणुका व संभाव्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी धैर्यशील माने यांनी थेट शेटटी यांच्या उमेदवारीला विरोध केला. तसेच पक्षाकडून वारंवार कसा माने गटावर अन्याय होत आहे, असा पाढाच वाचला. माने यांनी तक्रार करुनही परिस्थिती बदलण्याची चिन्हे नाहीत. खासदार शेटटी हे आघाडीचे उमेदवार समजून त्यांच्या प्रचारास सुरुवात झाली आहे. 

खासदार शेटटींना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शेटटी यांची आघाडीकडून उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. आता माने गटाला राष्ट्रवादीत राहून खा.शेटटींचा प्रचार करण्याचे आदेश मिळणार आहेत. हे आदेश पाळायचे की आपला वेगळा मार्ग धरायचा, याबाबत माने गटाचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याने धैर्यशील माने यांनी बैठक घेवून राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करण्याचा विचार बोलून दाखवला आहे. 

माने गटाकडे सध्या जिल्हा बॅंक संचालक पद सोडले तर दुसरे महत्वाचे पद नाही. धैर्यशील माने यांच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराने पराभव केला आहे. त्यामुळे माने गटाच्या अस्तित्वासाठी लढाई अत्यंत महत्वाची आहे. 

संबंधित लेख