man politics gore-deshmukh crisis | Sarkarnama

प्रभाकर देशमुखांची एन्ट्री गोरे समर्थकांना झोंबली! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आले पण आता या पाण्याला श्रेयवादाचा रंग चढू लागला आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यावर नाव न घेता आरोप करू लागले आहेत. तथाकथित जलतज्ज्ञ असे नामकरणही गोरे समर्थकांनी देशमुखांचे केले आहे.

सातारा : उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आले पण आता या पाण्याला श्रेयवादाचा रंग चढू लागला आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यावर नाव न घेता आरोप करू लागले आहेत. तथाकथित जलतज्ज्ञ असे नामकरणही गोरे समर्थकांनी देशमुखांचे केले आहे. पिंगळी तलावात पाणी येऊन पाच गावांचा पाणी प्रश्‍न सुटणार असला तरी गोरे-देशमुखांच्या संघर्षाला नव्याने सुरवात होणार आहे. दरम्यान, देशमुखांनी पहिल्यांदाच दाखविलेले राजकीय अंग गोरे समर्थकांना चांगलेच झोंबले आहे. 

उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आणण्याचे आश्‍वासन जयकुमार गोरे यांनी दिले होते. ते अनेकदा खरेही करून दाखविले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळी दोन वेळा आमदार गोरेंनी माण तालुक्‍यात उरमोडीचे पाणी नेले. त्याचे पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते पुजन देखील केले. माण तालुक्‍यातील कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने माणच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. पण आमदार गोरेंनी सत्ता असो किंवा नसो उरमोडीचे पाणी विविध युक्‍त्या क्‍लुप्त्या काढून माण तालुक्‍यात नेले. आता पिंगळी तलावात उरमोडीचे पाणी नेण्याची तयारी आमदार गोरेंनी केली आहे. 

नुकतेच विभागीय आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झालेले आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माण तालुक्‍यात विविध सामाजिक कामांतून चळवळ उभी केली आहे. ही चळवळ माणमधील स्थानिक राजकारण्यांना अडचणीची वाटू लागली आहे. मुळात प्रभाकर देशमुखांना राजकारणात येण्याची दिशा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दाखविली आहे. गोरेंना टक्कर देईल, असा कार्यकर्ता माणमध्ये नसल्याने प्रभाकर देशमुखांच्या माध्यमातून हा प्रयत्न करता येईल, असा कयास राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. देशमुख अंदाज घेत घेत राजकारणात सक्रिय होत आहेत. त्यामुळे आमदार गोरेंसह त्यांच्या समर्थकांकडून देशमुखांवर टिका होत आहे. 

पिंगळी तलावात उरमोडीचे पाणी आणण्याची तयारी आमदार गोरेंनी केली. पण किरकसाल येथून कालवा नेताना योग्य भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी काही ग्रामस्थ हटून राहिले. यासाठी प्रभाकर देशमुखांनी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना योग्य नुकसान भरपाई देण्याबरोबरच प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने उपाय केले जातील, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे पिंगळी तलावात उरमोडीचे पाणी येण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. यावरून आमदार गोरे व त्यांचे समर्थक उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात येण्याचे श्रेय देशमुखांनी लाटू नये यासाठी आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. तसेच प्रभाकर देशमुखांनीच दोन-चार ग्रामस्थ उठवून बसवून पिंगळी तलावात पाणी आणण्यासाठी विरोध केल्याचे गोरे समर्थकांनी उठविले आहे. मुळात प्रभाकर देशमुखांची सामाजिक चळवळीने जोर धरला असून आगामी काळात ते आपली अडचण ठरू नयेत, म्हणून आमदार गोरे व त्यांचे समर्थक प्रभाकर देशमुखांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. यातूनच उरमोडीच्या पाण्याला संघर्षाची झालर लागली आहे. आता हा संघर्ष आगामी काळात कोणते रूप घेणार आणि आणखी कोण कोण या संघर्षात उडी घेणार, याचीच उत्सुकता आहे. 

संबंधित लेख