mamta banaraji jiankiller | Sarkarnama

सोमनाथदांचा पराभव करीत ममतादीदी ठरल्या जायंट किलर 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

माकपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी सलग नऊ वेळा खासदार म्हणून (1971पासून) निवडून येत होते. मात्र त्याला अपवाद 1984 चा आहे. पश्‍चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती. दीदी जायंट किलर ठरल्या होत्या. 

माकपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांचे उच्चशिक्षण परदेशात झाले त्यानंतर ते मायदेशी परतले. वकीलीचा व्यवसाय सुरू केला आणि राजकारणात त्यांनी 1968 प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी 1971 मध्ये प्रथमच निवडणूक लढविली.

या निवडणुकीनंतर ते सलग नऊ वर्षे निवडून येत होते. मात्र त्याला अपवाद 1984 चा आहे. पश्‍चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना अस्मान दाखवत धूळ चारली होती. दीदी जायंट किलर ठरल्या होत्या. 

ही निवडणूक देशात गाजली होती. पश्‍चिम बंगाल हा कम्युनिस्टांचा बाल्लेकिला बनला होता. तर कॉंग्रेसचा सामना ! 

माकपशी होता. खरेतर जाधवपूर लोकसभा मतदारसंघात चॅटर्जींचा कधीच पराभव होणार नाही. त्यांना धुळ चारणारा जन्माला यायचा आहे असे मोठ्या अभिमानाने त्यावेळी बोलले जात होते. राजकारणातील अनेक चढउतार आणि उन्हाळेपावसाळे पाहिलेल्या या महान नेत्याविषयी लोकांनाही ममत्व होते. 

मतदार त्यांना कधीच धोका देणार नाहीत असे छातीठोकपणे सांगितले जात असे. पण मतदारांच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच ओळखता येत नाही. जेथे इंदिरा गांधीचा पराभव होऊ शकतो तेथे चॅटर्जीचा का नाही ? असा विश्वास ममता बॅनर्जींना होता.

मुळात ममतांकडे त्यावेळी गल्लीबोळातील नेत्या म्हणून पाहिले जात होते. कुठे सोमनाथदा आणि कुठे ममता बॅनर्जी असेही लोक त्यावेळी बोलत होते. सोमनाथदा निवडून येणारच. काहीच चिंता नाही याची पक्की खात्री कम्युनिस्ट नेत्यांना होती. 

ममता बॅनर्जी यांनी हा मतदारसंघ पिंजून काढतानाच लोकांची मने जिंकली होती. कम्युनिस्टांशी त्यांचे लढणे लोकाना आवडत होते. झाले ही तसेच. जेव्हा जाधवपूरची मतमोजणी सुरू झाली. तेव्हाही कम्युनिस्ट कार्यकर्ते विजयाची प्रतीक्षा करीत बसले होते. पण, झाले निराळेच.

ममतादीदी जायंट किलर ठरल्या. त्यांनी बलाढ्य अशा सोमनाथदांचा चक्क पराभव केला होता. पुढे ते 1989 मध्ये निवडून आले होते. म्हणजे सोमनाथदा दहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते 

भारतीय राजकारणात सोमनाथदांना मानाचे पान आहे. सर्वपक्षात त्यांना आदराचे स्थान होते. सोमनाथदांचा प्रथमच पराभव झाला होता याचे शल्य भल्याभल्यंना होते. पण दुसरीकडे ममतादिदीनी देशाचे लक्ष स्वत:कडे वेधले होते. पश्‍चिम बंगालमधील एका महिलेने बलाढ्य अशा सोमनाथदांना चारीमुंड्याचित केले होते हे खरे. ही निवडणूक सोमनाथदा गेल्यानंतर आज सर्वांना पुन्हा आठवली असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख