mamata banarje about shikago tour | Sarkarnama

काही व्यक्‍तींच्या कारस्थानामुळे मी शिकागोला जाऊ शकत नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

अमेरिकेत शिकागोमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करण्यासाठी आयोजकांवर दबाव आणल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेस पक्षाने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला.

कोलकता : स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त अमेरिकेत शिकागोमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करण्यासाठी आयोजकांवर दबाव आणल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेस पक्षाने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना निमंत्रण होते. 

"विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाल्याने शिकागोतील विवेकानंद वेदांता सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांना निमंत्रण दिले होते. ते स्वीकारल्याचे मुख्यमंत्र्यांकडून कळविण्यात आले होते. मात्र प्रचंड दबाव टाकण्यात आल्याने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतल्याचे समजते. यात भाजप व आरएसएसचा हात आहे, अशी टीका तृणमूलचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी गुरुवारी केली. शिकागोत "ग्लोबल हिंदू कॉंग्रेस'तर्फे (जागतिक हिंदू संघटना) होणारा एकच मोठा कार्यक्रम व्हावा, अशी भाजप-संघाची इच्छा होती, असे यातून दिसले आहे. या कार्यक्रमाला आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार होते. 

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (ता.11) केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मला शिकागोला जायचे होते. पण काही व्यक्‍तींच्या कारस्थानामुळे मी जाऊ शकत नाही. या घटनेमुळे मी व्यस्थित झाले आहे.' ममता बॅनर्जी यांना शिकागोला जाण्याची परवानगी नाकारल्याचे वृत्त परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (ता. 12) फेटाळले. त्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्याची अशी विनंती सरकारकडे आली नसल्याचे या मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. 

संबंधित लेख