माळीणगाव सरकारच्या भ्रष्टाचाराचे  पारदर्शक उदाहरण ः सचिन सावंत 

माळीणगाव सरकारच्या भ्रष्टाचाराचे  पारदर्शक उदाहरण ः सचिन सावंत 

मुंबई : सरकारने पुनर्वसन केलेल्या माळीणगावाची पहिल्याच पावसात झालेली दुर्दशा हे राज्यातील फडणवीस सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराचे पारदर्शक उदाहरण आहे; अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली. 

पुनर्वसन केलेले माळीणगाव हे राज्यातील स्मार्ट ग्राम असून पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच वर्षी दोन महिन्यांपूर्वी 2 एप्रिल रोजी झालेल्या माळीण येथील लोकार्पण कार्यक्रमात केला होता. पण; पहिल्याच पावसात माळीणगावची झालेली दुर्दशा पाहता मुख्यमंत्र्यांचा दावा किती फोल होता हे स्पष्ट झाले आहे. भयानक दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कोट्यवधींचा खर्च करून माळीण गावाचे पुनर्वसन केले. मात्र अवघ्या दोनच महिन्यात पहिल्याच पावसात पुनर्वसीत माळीण गावची दुर्दशा झाली आहे. यामुळे माळीण गावातील लोकांना पुन्हा एकदा भितीच्या सावटा खाली जीवन जगावे लागते आहे. 

काही ग्रामस्थ घर सोडूनही गेले आहेत. सरकारने जागेची निवड करून पुनर्वसन केलेल्या माळीण गावातील घरांच्या भिंती,पायऱ्या, ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते,भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. शाळेवर भिंत कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा धास्ती आहे भितीचे वातावरण आहे. सरकारने फक्त पुनर्वसनाच्या मोठ मोठ्या गप्पा मारल्या. प्रत्यक्षात मात्र पुनर्वसनाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून पुनर्वसनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लोकांच्या जीविताला असणारा धोका नव्या पुनर्वसीत गावातही कायम असल्याचे चित्र आहे. पारदर्शकतेच्या गप्पा मारणा-या फडणवीस सरकारचे पाय ही मातीचेच आहेत हे यातून सिध्द झाले आहे असे सावंत म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com