malegaon election | Sarkarnama

मालेगावमध्ये भाजपचे 54 मुस्लीम उमेदवार, मनसेचा उमेदवारच नाही

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 मे 2017

नाशिक / मालेगाव : गेल्या साठ वर्षात मुस्लीम मतदार केंद्रित राजकारणाचे केंद्र असलेल्या मालेगाव शहरात भाजपने 77 जागांवर उमेदवार देत 54 मुस्लिमांना संधी दिली आहे. अन्य प्रतिस्पर्धी पक्षांनाही सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. त्यामुळे हिंदुत्वाचा आक्रमक अजेंड्याचा आरोप होणारा भाजप या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 

नाशिक / मालेगाव : गेल्या साठ वर्षात मुस्लीम मतदार केंद्रित राजकारणाचे केंद्र असलेल्या मालेगाव शहरात भाजपने 77 जागांवर उमेदवार देत 54 मुस्लिमांना संधी दिली आहे. अन्य प्रतिस्पर्धी पक्षांनाही सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. त्यामुळे हिंदुत्वाचा आक्रमक अजेंड्याचा आरोप होणारा भाजप या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 

भाजपचा गेल्या सभागृहात एकही सदस्य नव्हता. यावेळी पक्षाने सर्वाधिक 77 उमेदवार दिले असून 54 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामध्ये 32 महिला आहेत. मावळत्या सभागृहातील संख्याबळ पाहता एकही नगरसेवक नसताना मुस्लिम मतांवर डोळा ठेवून भाजपने सर्वाधिक जागांवर उमेदवार देत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हान दिले आहे. "एमआयएम' ने जोर धरला तर कदाचित मतविभागणीत भाजपचे उमेदवार चमत्कारही करतील. 

शहराच्या 21 प्रभागांमधून 84 उमेदवार निवडून जाणार आहे. यातील 5 प्रभाग हिंदूबहुल तर उर्वरित 16 प्रभाग हे मुस्लिम भागात मोडतात. शहरात घडलेल्या दंगली, बॉम्बस्फोट यामुळे जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नदी के इस पार और नदी के उस पार असे पूर्व पश्‍चिम भाग पडले आहेत. शहराच्या पश्‍चिम पट्ट्यातील हिंदूबहुल पाच प्रभागांमधून 20 नगरसेवक निवडून जाणार आहेत. तर बहुसंख्य मुस्लिम असलेल्या पूर्व भागातील 16 प्रभागांतून 64 नगरसेवक निवडले जाणार आहेत. 

मुस्लिम मते आपल्या हक्काची समजून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, सपाने या मतांच्या बळावर यापूर्वी निवडणुका लढविल्या आहेत. यंदाच्याही निवडणुकीत हे पक्ष पूर्ण शक्तीनिशी उतरले आहेत. भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये मुस्लिम इच्छुकांची संख्या अधिक होती. विशेषतः या इच्छुकांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी एमआयएमकडून संधी न मिळालेल्या नाराजांना भाजपने आपल्या गळाला लावले आहे. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसने 75 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर अन्य ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी जनता दलाच्या आघाडीने 64 उमेदवार दिले आहे. कोणत्याही पक्षाला सर्वच्या सर्व म्हणजे 84 जागांवर उमेदवार मिळालेले नाही. भाजपने पहिल्यांदाच सर्वाधिक 77 जागा स्वबळावर लढविण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरविले आहे. दरम्यान शिवसेनेनेही 26 जागांवर उमेदवार देतांना 2 मुस्लीम चेहरे उभे करून पूर्व भागात नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. 
मालेगावमध्ये मनसेला उमेदवारच नाही 
शहराच्या राजकारणात मनसे भुईसपाट झाली आहे. गेल्या निवडणुकीत कडवे आव्हान देणारी मनसे यावेळी एकही उमेदवार देवू शकले नाही. बाळासाहेब अहिरे व गुलाब पगारे या दोन्ही नगरसेवकांनी अनुक्रमे शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन वर्षापूर्वीच पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. तालुकाध्यक्ष पप्पू पवार यांनी शिवसेनेची वाट धरली. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीचे खातेही उघडले नाही. 
2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची जोरदार हवा होती. उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसून आली. पश्‍चिम भागाबरोबरच पूर्व भागातही उमेदवार दिले होते. शिवसेनेपुढे मनसेने कडवे आव्हान उभे केले होते. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे मोठी जाहीर सभा झाली होती. निवडणुकीत दोन नगरसेवक निवडून आले होते. तर सहा ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पाच वर्षात पक्षाची वाताहात झाली. 
महापालिका निवडणुकीत यावेळी मनसेकडून कोणी इच्छुक दिसले नाही. जिल्हा पातळीवरील नेत्यांनीही तसे प्रयत्न केले नाहीत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप, शिवसेनेत विखुरले गेले. निवडणुकीत माकप, भाकप, समाजवादी पक्ष आदी छोट्या पक्षांचे अस्तित्व टिकून आहे. गेल्या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केलेला मनसेचे नामोनिशाण शिल्लक नाही. 
शहरासाठीचा बहुप्रतिक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झाला असून त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. एकीकडे शहरवासीयांना रेल्वे इंजिनची प्रतीक्षा असतानाच मनसेचे रेल्वे इंजिन मात्र रुळावरुन घसरले आहे. गेल्या पाच वर्षात पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. जिल्हा व प्रदेश पातळीवरील नेत्यांनी मालेगावकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या दोन्ही नगरसेवकांनी उपमहापौर युनूस यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीत नोंदणी केली होती. 

संबंधित लेख