mahesh gurav elected as nagaradhyaksha in vaduj | Sarkarnama

उदयनराजेंच्या काँग्रेसमधील समर्थकाला नगराध्यक्षपदाची 'लॅाटरी'!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

राष्ट्रवादीच्या नाराज महिला नगरसेविका सुनीता कुंभार यांनी अनपेक्षित पणे गुरव यांच्याबाजूने मतदान केले.  

सातारा : वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक महेश गुरव यांची निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे अनिल माळी यांचा नऊ विरुद्ध आठ असा पराभव केला.

खटाव (जि. सातारा) तालुक्यातील वडूज ही महत्वाची नगरपंचायत आहे. 17 नगरसेवक असणाऱ्या वडूज नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे पाच, अपक्ष चार तर भाजपचे तीन असे पक्षीय बलाबल आहे. मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच ,भाजपचे तीन व अपक्ष चार अशा एकूण 12 नगरसेवकांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा सचिन माळी यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले होते. शोभा माळी यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

सध्या भाजप व राष्ट्रवादी यांची वडूज नगरपंचायतीत युती आहे. महेश गुरव हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. दुष्काळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले वडुजला आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत गुरव यांनी अपक्ष नगरसेवकांसह कमराबंद चर्चा केली होती. त्या वेळेपासून हे चार अपक्ष नगरसेवक भाजप – राष्ट्रवादीपासून दुरावले. बहुमतासाठी एका मताची गरज असताना राष्ट्रवादीच्या नाराज महिला नगरसेविका सुनीता कुंभार यांनी अनपेक्षित पणे गुरव यांच्याबाजूने मतदान केले.  

संबंधित लेख