mahendra pathare shuts his mouth | Sarkarnama

नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या तोंडावर चिकटपट्टी! कारण की.... 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी पुणे पालिका सभागृहातही सत्ताधारी भाजपला विरोध करताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्यापासून ते विविध पोषाख परिधान करणे असे अनेक फंडे वापरले. आता स्थानिक आमदार जगदीश मुळीक यांनाही त्यांनी या फ्लेक्‍स फलकांद्वारे अंगावर घेतले आहे. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी सध्या स्वतःच्या तोंडावर चिकटपट्टी लावल्याचे फ्लेकस वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सर्वत्र लावले आहेत. त्यासाठी कारणही तसेच घडले आहे. इंधन दरवाढीपासून ते पुण्याच्या वाहतुकीचा खेळखंडोब्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत, असा आरोप करत पठारे यांनी केला आहे. मात्र सरकार कथित पारदर्शक असल्याने त्या विरोधात बोलायचे नाही, अशी उपरोधिक टीका फ्लेक्‍स द्वारे केली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार जगदीश मुळीक यांनाही पठारे यांनी फ्लेक्‍सद्वारे लक्ष्य केले आहे. मात्र त्यांची ही "चुप्पी' भाजप सरकारच्या विरोधात असली तरी त्यांनी या चुप्पीद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवाज या निमित्ताने टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. महेंद्र पठारे यांचा खरेच तसा प्रयत्न असेल तर या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणखी वाद सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

महागाई वाढली काही बोलायचे नाही, कारण सरकार पारदर्शक आहे....पुण्याच्या डीपीत आरक्षण उठवली... काही बोलायचे नाही कारण सरकार पारदर्शक आहे.. वडगाव शेरीत पाण्याची आणिबाणी...नियोजनात अडलयं भामा आसखेडचे पाणी....त्यावरही काही बोलायचे नाही कारण सरकार पारदर्शक आहे...अशा अनेक कल्पक घोषणा पठारे यांनी दिल्या आहेत. 

संपूर्ण वडगाव शेरीत त्यांचे फ्लेक्‍स प्रदर्शित झाल्याने ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे चुलते व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली असतानाच महेंद्र यांनी आवाज टाकला आहे. या फलकांवर एकट्या महेंद्र यांचाचा फोटो आहे. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा किंवा त्यांच्या चुलत्यांचाही फोटो नाही, ही बाब सूचक मानण्यात येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून आणखी एका इच्छुकाच्या संख्येत भर पडली आहे. बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे या दोघांसोबत महेंद्र यांनीही आपला जोर आतापासूनच लावला आहे. 

संबंधित लेख