विधीमंडळातील भाषणांतून जे समजतं ते दहा पुस्तकांतूनही कळत नाही : बापट

विधीमंडळ कामकाजमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. टेल्को कंपनीतील कामगार ते राज्याचा मंत्री अशी मजल त्यांनी मारली आहे. मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांचा हा प्रवास समजून घेणे म्हणजे राजकारण कळणे. सरकारनामा फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी हा प्रवास उलगडून दाखवला. त्यांच्या मुलाखतीचा हा पहिला भाग.
विधीमंडळातील भाषणांतून जे समजतं ते दहा पुस्तकांतूनही कळत नाही : बापट

प्रश्न : तुमच्या राजकीय आयुष्याची सुरुवात कशी झाली ?त्याबद्दल सांगा?

उत्तर : मी गेल्या ४०-४५ वर्षांत सामाजिक व राजकीय जीवनात काम करतोय. मी  पुण्याला येण्याअगोदर तळेगावला होतो. तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं. जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो. त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी रमणबागेत आलो. महाविद्यालयीन शिक्षण  बीएमसीसीमध्ये झाले. त्यानंतर मी टेल्को कंपनीत नोकरीस  लागलो. माझं एक ठाम मत होतं आणि आहे कि राजकरण हा उपजिविका करण्याचा व्यवसाय नाही. राजकारण हे समाजाचे प्रश्न सोडवण्याचे माध्यम आहे. पण राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपजिविकेसाठी नोकरी व्यवसाय केला पाहिजे. मला नोकरी सोडण्यासाठी खूप आग्रह करण्यात आला पण मी रिटायार्ड होईपर्यंत नोकरी केली. टेल्कोमध्ये काम करताना मी कामगार संघटनेचा नेता म्हणून काम केले. याचदरम्यान मी नगरसेवक झालो. नगरसेवक असताना लोकांची माझ्याकडे कामासाठी गर्दी व्हायची. टेल्को मध्ये काम करता असताना कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यरत रहात होतो. त्याचवेळी पुण्यातही नगरसेवक म्हणून माझ्याकडे लोक काम घेऊन यायचे ती काम मी करत होतो. नगरसेवक आणि कामगार नेता अशी माझी राजकीय सामाजिक आयुष्याची सुरुवात झाली. 

प्रश्न : माणसं जोडणं, सतत माणसाच्या सोबत राहणं तुम्हाला आवडत? तुम्ही माणसं कशी जोडता?

उत्तर : मनात इच्छा असली की काहीही अवघड नसतं. मी माणसांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी विद्यार्थी असल्यापासून वेगवेगळ्या क्रीडा मंडळाशी संपर्कात आहे. मी स्वतः कबड्डी आणि फुटबॉल खेळतो. या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मला अनेक लोक जोडता आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या कि माणसं समजून घेता येतात. तिथं तुमची विचारधारा आड येत नाही. पुण्यात तर वेगवेगळे कट्टे आहेत या कट्ट्यावर तुम्हाला अनेक लोक भेटतात, त्याची मते समजतात, प्रश्न समजतात, समाज समजून घायला आपण स्वतः गेलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. क्रीडा मंडळापासून ते गणेश मंडळापर्यंत मी कार्यरत असतो. अगदी शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत मी थांबतो. समाजात मिसळलं कि समाजाची नाडी समजते. समाजात काय करायला हवं हे समाजातील लोकांच्याकडून समजतात आणि समाजाच्या विचाराची दिशा कळते.

प्रश्न : तुमच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ कसा झाला?

उत्तर : मी १९८३  साली पहिल्यांदा नगरसेवक झालो. याकाळात मी सतत लोकांच्या कामात असायचो. तेव्हा अनेक लोक त्यांचे जिवंत असल्याचे दाखले घ्यायला माझ्याकडे यायचे. ते ज्येष्ठ नागरिक असायचे. त्यांच्या पेन्शनसाठी तसा दाखला हवा असायचा. तुम्ही जेव्हा लोकांची कामे करता तेव्हा ते लोक तुमची विनामूल्य प्रसिद्धी  करतात. आपण काम करताना मात्र समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे कधीही बघायचं नाही ,समोर येईल त्या माणसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मी नगरसेवक झाल्यावर पुणे शहर पिंजून काढलं. सगळ्या वस्त्या फिरलो. पुण्यातील प्रश्न समजून घेतले. या सगळ्याचा मला नंतर फायदा झाला.

प्रश्न : विधिमंडळात सर्वाधिक काळ उपस्थित राहणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख आहे ,त्याबाबत सांगा.

उत्तर : विधिमंडळात राज्यातील प्रश्नांची चर्चा होते आणि प्रश्न सोडवले जातात. तिथं हजर राहणं हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. तिथं गणपतराव देशमुख यांच्यासारखे  आमदार दुष्काळावर भाषण करतात तेव्हा तुम्हाला दहा पुस्तकं वाचून दुष्काळ समजणार नाही तो त्यांच्या भाषणातून समजतो. जेव्हा एखादा  कामगार प्रतिनिधी बोलतो ,शेतकरी प्रतिनिधी बोलतो तेव्हा त्यांचे प्रश्न समजतात आणि हे समजून घेताना आपल्या ज्ञानात भर पडते. मला या पंचवीस वर्षात विधीमंडळात खूप काही शिकलो आहे. आता मी संसदीय कार्यमंत्री आहे. मी उपस्थितीबाबत शिस्त लावतो म्हणून मला विनोदाने गुरुजीही म्हणतात. मला विधिमंडळाच्या कामकाजात शिस्त महत्वाची वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com