उदयनराजेंनी कॉलर उडवली...अन्‌ एकच जल्लोष उडाला 

 उदयनराजेंनी कॉलर उडवली...अन्‌ एकच जल्लोष उडाला 

सातारा : अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्हा रुग्णालया समोरून गाडीतून गेलेले खासदार उदयनराजे भोसले पोवईनाक्‍यावर येताच आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली आणि कार्यकर्त्यानीं जल्लोष करतानाच घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजे याही उपस्थित होत्या. 

उदयनराजे पोवईनाक्‍यावर येणार असल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजली. त्यामुळे नगराध्यक्षा, नगरसेवक तसेच शहर व जिल्ह्यातील हजारो समर्थक पोवईनाक्‍यावर त्यांची वाट पहात थांबले होते. येथे रामराजेंच्या विरोधात व उदयनराजेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. काही वेळाने उदयनराजेंच्या पत्नी दयमयंतीराजे भोसले याही पोवईनाक्‍यावर आल्या. तब्बल तासाभराच्या प्रतिक्षेनंतर उदयनराजे पोवईनाक्‍यावर आले.अन्‌ कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणांनी संपूर्ण परिसरात दणाणून गेला होता. उदयनराजे व दमयंतीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांनी कॉलर उडावली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह पाहून उदयनराजेंनी तेथूनच शर्टच्या भाया मागे सारल्या आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. त्यातून दोन वेळा उदयनराजेंनी बोट दाखवून खुन्नस देण्याची ऍक्‍शन केली. पुतळ्यांच्या पायऱ्यावरून खाली उतरून ते कार्यकर्त्यांसह आपल्या फोर्ड गाडीतून ऑफिसर क्‍लबकडे निघून गेले. त्यानंतर दिवसभर ताटकळलेल्या कार्यकर्त्यांनी आनंदाच्या भरात घरचा रस्ता धरला. दुपारपासून ट्रॅफिकमध्ये अडकलेले सातारा शहराचे रस्ते मोकळे झाले. 

उदयनराजेंचे आजही धक्कातंत्र 
खंडणीच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सुमारे तीन महिने उदयनराजे साताऱ्यात नव्हते. मागील आठवड्यात उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर उदयनराजेंचे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उदयनराजेंना कधीही अटक होऊ शकते असे म्हटले होते. उदयनराजेंच्या स्वभावाला न मानवणारी ही कोंडी त्यांनी शुक्रवारी रात्री गनिमी काव्याने फोडली. शुक्रवारी रात्री त्यांनी बिनधास्तपणे रोड शो करत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. कार्यकर्त्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले. मात्र, पोलिस यंत्रणा काहीच करू शकली नाही. या प्रकारानंतर पोलिसांवर चहुबाजूनी टीका झाली. त्यामुळे उदयनराजेंना हजर करून घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली वाढल्या होत्या. एक-एक दिवस जाईल तसा पोलिसांवरील दबाव वाढत होता. त्यामुळे डिप्लोमसीचे निकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सरळ हातात येतील ते उदयनराजे कसले. उदयनराजेंच्या हालचालीची माहितीही पोलिस दलाकडे नव्हतीच. पहाटे दोन ते चार ते साताऱ्यातील एका हॉटलेवरच होते. नंतर पुण्याला जावून ते पुन्हा साताऱ्यात आले. आणि आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी पोलिस दलाला धक्काच दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com