शिवसेना म्हणजे "फुका मारे बोंबा आणि घाम नाही अंगा' 

शिवसेना म्हणजे "फुका मारे बोंबा आणि घाम नाही अंगा' 

मुंबई : कर्जमाफी मिळाली तर आमचे श्रेय आणि मिळाली नाही तर भाजपची चूक अशी त्यांची भूमिका असून "फुका मारे बोंबा आणि घाम नाही अंगा " अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यांनी आज केली. 

फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे दाखले देत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कर्जमाफीचा विधानपरिषदेत बुरखा फाडला. मागील तीन वर्षांपूर्वीच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी होती, परंतु उशीर केल्याने आज राज्यात 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्याचे त्याचे सर्व पाप या सरकारचे असल्याची घणाघाती टीकाही मुंडे यांनी सरकारवर केली. 

शिवसेनेचे मंत्री कर्जमाफीच्या प्रश्नावर आपला राजीनामा खिशात घेऊन फिरत असल्याचे सांगत होते, त्याचे पक्ष प्रमुख कर्जमाफीच्या विरोधात असतानाच त्यांच्या मंत्र्यांनी मात्र सरकारच्या कर्जमाफीच्या प्रस्तावावर सह्या केल्या. त्यामुळे त्यांची विश्वासअर्हता ही संपून जात आहे. आता ढोल वाजविण्याचे जे काही सोंग केले जाते, त्यामुळे कर्जमाफी मिळत नसेल तर शिवसेनेनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्लाही मुंडे यांनी शिवसेनेला दिला. 

सरकारने कर्जमाफी केली परंतु, त्याची अद्यापही नीट अंमलबजावणी केली नसल्याने या काळात 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपला जीव गमावला, तरीही सरकार आपल्या धाडसी आणि ऐतिहासिक कर्जमाफीची अंमलबजावणी करू शकले नाही. कर्जमाफी दिली नाही, परंतु त्यासाठीच्या जाहीरातींवर 36 लाखांचा खर्च करण्यात आला. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची योजना आणली गेली असली तरी त्यांचा आदर्श मात्र या सरकारने घेतला नाही. महाराजांनी आपल्या काळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या शेतातून सोन्याचा नांगर फिरवला, या सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या घरादारांवर नांगर फिरवून त्यांना त्यांना उद्धवस्त केले आणि हेच सरकार आज सभागृहात कर्जमाफीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणत असून हा प्रस्तावच मोठा क्‍लेषदायक असल्याची टीकाही मुंडे यांनी केली. 

सरकारने कर्जमाफीसाठी केलेल्या आकड्याचा खेळ मांडत मुंडे म्हणाले, की धाडसी कर्जमाफीत कोणते धाडस सरकारने दाखवले आहे, ते स्पष्ट करावे. त्यासोबतच सरकारकडून करण्यात येत असलेल्या कृषीदराच्या वाढलेल्या दाव्यांवरही त्यांनी आक्षेप नोंदवत पेरणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना कशी मदत केली नाही, याचे दाखलेही त्यांनी दिले. तूरीच्या उत्पन्नासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातही शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली, पिके चांगली आली, परंतु नोटबंदीची त्याला नजर लागली. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही, म्हणूनच शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आल्याचेही सांगत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये अशी विनंतीही त्यांनी केली. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के हमी भाव देण्याचे कबूल केले होते. त्याचे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com