Maharashtra Vijay Vadettivar | Sarkarnama

कृषीकेंद्रांच्या मालकांना काही मंत्र्यांचे संरक्षण : विजय वडेट्टीवार यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशके व बी-बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांच्या मालकांवर राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा वरदहस्त असल्याने फौजदारी कारवाई होत नसल्याचा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशके व बी-बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांच्या मालकांवर राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा वरदहस्त असल्याने फौजदारी कारवाई होत नसल्याचा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

यवतमाळ जिल्ह्यातल किटकनाशके फवारणी करताना 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमदार वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे. यात आमदार विरेंद्र जगताप, आमदार राहुल बोंद्रे, आमदार यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. या नियुक्तीनंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ''या सरकारला लोकांच्या जिवांची काहीही किंमत दिसत नाही. मुख्यमंत्री 2 ऑक्‍टोबरला वर्ध्याला येतात व परंतु तेथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंब तालुक्‍यात जाऊन मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेत नाहीत. ही कसली संवेदनशीलता

''कृषीकेंद्रांतून विकल्या गेलेल्या किटकनाशकांना परवानगी होती काय? ते कापसावर फवारण्यासाठी योग्य होते काय? या प्रश्‍नांची चौकशी झाली पाहिजे. अद्यापही एकाही कृषीकेंद्राच्या मालकांवर फौजदारी कारवाई झाली नाही. या कृषीकेंद्र मालकांवर कारवाई करण्यासाठी सरकार कुणाची वाट पाहत आहे,'' असा सवाल करून ते म्हणाले, ''यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र मालकांचे राज्यातील काही मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. यापैकी एक जण बराच प्रभावशाली असल्याने सरकार या कृषी केंद्र मालकांवर कारवाई न करता त्यांना संरक्षण देत आहे,''

या मंत्र्यांची नावे काय? असे विचारले असता ते म्हणाले, ''यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मंत्र्यांची नावे माहित आहेत. या संदर्भात आपण विधानसभेत बोलू. किटकनाशके फवारणी करताना मृत पावलेल्या कुटुंबांची भेट देण्यास विदर्भातील कृषी मंत्री असलेल्या पांडुरंग फुंडकर यांना वेळ मिळाला नाही. शेतकऱ्यांशी नाळ असल्याचे सांगणारे हे मंत्री आता कुठे आहेत? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.''

संबंधित लेख