Maharashtra Tribal Department Committed Fraud Alleges Uttam Jankar | Sarkarnama

राज्यात 2 लाख कोटींचा आरक्षण घोटाळा - भाजप नेते उत्तम जानकर यांचा आरोप

भारत नागणे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

धनगर  समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ठ करुन त्यानुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य धनगर आरक्षण कृती समितीने पुन्हा आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुणे येथे मेळावा घेवून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.  आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन वारंवार खोटी आश्वासने देत आहे - उत्तम जानकर 

पंढरपूर : "राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. सध्या तुर घोटाळा गाजत असतानाच आता आरक्षण घोटाळा समोर आला आहे. वाढत्या घोटाळ्यांमुळे सरकारची विश्वासहर्ता धुळीला मिळाली आहे. राज्यातील आदिवासी विभागाने आदिवासी समाजाची बोगस लोकसंख्या  दाखवून  दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा केला आहे," असा गंभीर आरोप सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य उत्तम जानकर यांनी येथे केला. 

गेल्या 38 वर्षापासून हा घोटाळा सुरु असून ही माहिती, माहिती अधिकारात समोर आली आहे. या आरक्षण महाघोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी ही श्री. जानकर यांनी आज येथे झालेल्या  पत्रकार परिषदेत केली.  

जानकर यांनी सांगितले की, धनगर  समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ठ करुन त्यानुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य धनगर आरक्षण कृती समितीने पुन्हा आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुणे येथे मेळावा घेवून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.  आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन वारंवार खोटी आश्वासने देत आहे. राज्यातील एसटी समाजाची लोकसंख्या जिल्हा निहाय किती आहे, याची  माहिती आदिवासी विभागाकडून माहिती आधिकाराखाली मागितली होती.  माहिती  मिळाल्यानंतर फुगवून दाखवलेल्या लोकसंख्येमुळे आदिवासी विभागाचा आरक्षण महाघोटाळा समोर आला आहे.

सन 1981 ते 2011 पर्यंत आदिवासी विभागाकडून महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या 80 लाख इतकी दाखवण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 19 लाख 50 हजार आदिवासी लोकसंख्या बोगस असल्याचं जानकरांच म्हणणं आहे. अस्तित्वात नसलेल्या बोगस आदिवासींची वाढीव  लोकसंख्या दाखवून  या समाजाने राजकीय,शैक्षणिक, नोकरी व विकास निधीचा घोटाळा केल्याचा आरोपही जानकरांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 80 हजार आदिवासी समाज असल्याचे कागदोपत्री  दाखवण्यात आले आहे.परंतु प्रत्यक्षात 7 हजार 300 इतकी आदिवासी समाजाची संख्या आहे. यामध्ये जिल्ह्यातही 72 हजार 700 इतकी बोगस आदिवासी लोकसंख्या दाखवण्यात आल्याचेही जानकर यांनी सांगितले. जिल्हयात  आदिवासी  विभागाने धनगड समाजाची 1 हजार 659 कुटुंबे असल्याचे सांगितले आहे. वास्तवात सोलापूर जिल्ह्यात धनगड समाजाचे एकही कुटुंब नसल्याचा दावा जानकर  यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख