Maharashtra state cabinet expansion postponed ! | Sarkarnama

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ? इच्छुक अस्वस्थ

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नवरात्राचा मुहुर्त!

गणेशोत्सवाचे दिवस आता जवळपास संपत आले आहेत. पितृपंधरवडा कोणताही चांगला निर्णय घेण्यास पसंत केला जात नाही. त्यामुळेच आता विस्तारासाठी नवरात्राचा मुहुर्त असेल अशी या इच्छुकांना आशा आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात परतण्याची लागलेली आस, प्रकाश महेता सुभाष देसाई या ज्येष्ठ मंत्र्यांची सुरू असलेली चौकशी तसेच केंद्राच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झालेली शिवसेना या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात विस्तार केला जाणार नाही अशी शक्‍यताही बोलून दाखवली जाते आहे.

मुंबई:  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लांबल्यात जमा आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या कोणत्याही प्रकारचे बदल होण्याची शक्‍यता नसल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील, अशी नेत्यांना आशा आहे. मात्र निर्णयाचे स्पष्ट संकेत मिळत नसल्याने इच्छुक अस्वस्थ आहेत.

सध्या अनेक कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार होणे कठीण आहे, असे सांगण्यात येते. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे स्वत:हून पायउतार झाले आहेत. त्यांच्या विषयीचा झोटिंग समितीचा अहवाल, तसेच न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण लक्षात घेता खडसे यांच्याबाबत कोणताही निर्णय सध्या शक्‍य नाही. खडसे यांची प्रशासनावरची पकड लक्षात घेता सध्या त्याबाबतीत चाचपडणाऱ्या मंत्रिमंडळाला त्यांची मदत झाली असती; परंतु महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे ते डोकेदुखी ठरू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत कोणताही निर्णय लगेच होणे अशक्‍य आहे. मुंबईतील गुजराती समाजाचे कथित नेते प्रकाश महेता यांचीही चौकशी होणार आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका होऊनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपदावरून दूर केले नाही. 

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचीही सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना मंत्रिपदासाठी कोणती नावे पुढे करील याबद्दलही कुणाला खात्री देता येत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातील खांदेपालटामुळे शिवसेना नाराज आहे. अशा परिस्थितीत नाराजी ओढवून घेण्याऐवजी विस्तार लांबणीवर टाकला जाण्याची शक्‍यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

संबंधित लेख