उघड्यावर शौचास गेलेल्या महिलांच्या गळ्यात हार घालून : सोलापूर सिईओ डाॅ. भारूड यांनी केले फोटोसेशन

सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याचा 'प्रताप' सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी गाजवला आहे. हे फोटो सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर पाठविण्यात आले होते.
उघड्यावर शौचास गेलेल्या महिलांच्या गळ्यात हार घालून : सोलापूर सिईओ डाॅ. भारूड यांनी केले फोटोसेशन

सोलापूर - सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याचा 'प्रताप' सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी गाजवला आहे. हे फोटो सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर पाठविण्यात आले होते.

डाॅ. राजेंद्र भारूड थेट ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सांगोला तालुक्यांतील चिकमहुद येथे मुक्कामी आले होते. सायंकाळी कलापथकाचा कार्यक्रम संपवून ग्राम सभेत चिकमहुद गावाला त्यांनी स्वच्छतेचे धडे दिले. ते रात्री गावात मुक्काम करणार म्हटलेवर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यांची धावपळ उडाली. ग्रामपंचायती मध्ये बैठक मारून तिथेच सतरंजी टाकून मुक्काम करण्याचा डाॅ. भारूड यांनी  निर्धार केला. परंतू, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गाव हागणदारी मुक्त करण्याचा शब्द दिल्या नंतर  त्यांनी नंतर एका नवीन वास्तूमध्ये मुक्काम केला.

पहाटे पाच वाजता सिईओ डाॅ. भारूड आपले सहकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सचिन सोनवणे, शंकर बंडगर यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आले. तिथे महिला बचत गटांची टीम घेऊन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे हजर होत्या. डाॅ. भारूड यांनी आदल्या दिवशी गावातील सर्व हागणदारी ची ठिकाणे माहिती करून घेतली होती. मळ्याच्या वाटेवरील भागात तिघांना उघड्यावर शौचालयास जाताना तंबी देणेत आली. फुलांचे हार घालून त्यांचे 'स्वागत' करण्यात आले.

आयएएस अधिकारी स्वच्छतेच्या कामासाठी गावात फिरत आहेत म्हटल्यावर गावातील तरूण, बचत गटाच्या महिला सिईओ समवेत गुडमाॅर्निग पथकान सहभागी झाल्या. मार्गावरून जात असताना बाॅडीगार्डचा शिट्टीचा आवाज एेकून उघड्यावर शौचास जाणारेंची पळता भुई थोडी झाली होती. हलगी वादकास सोबत घेवून ५० युवकांसह व महिला बचतगट सदस्यांसह गावाची दोन किलोमिटरची शिवार पायी फेरी डाॅ. भारुड यांनी केली. थेट शौचालय नसलेले कुटुंबाची घरी भेट घेऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी डाॅ. भारुड प्रवृत्त करत होते.

मात्र, याच दरम्यान उघड्यावर शौचाला बसलेल्या काही महिलांना उठवून त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचा 'सत्कार' करण्याचा आततायीपणा डाॅ. भारुड यांनी केला. त्यावेळी फोटोही काढण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले होते. हे फोटो प्रेसनोट सह सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाॅट्स्अॅप ग्रुपवर पाठवण्यात आल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीला आला.

उघड्यावर शौचाला बसणे ही या महिलांची चूक असली तरीही त्यांचे फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर टाकणे हे चुकीचे असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे देखील महत्त्वाचे आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक करत महिलांचा आशा प्रकारे अपमान केला गेल्याने लोकांमध्ये संताप उसळला आहे.

पोलिस गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींच्या चेहेऱ्यावर काळे कापड घालतात. इथे मात्र ग्रामीण भागातल्या महिलांना सुविधांअभावी उघड्यावर शौचाला बसावे लागते त्याची शिक्षा म्हणून त्यांचे हार घातलेले फोटो सोशल मिडियावर टाकण्यात आल्याच्या प्रकाराची गंभीर चर्चा आता सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com