Maharashtra Sena BJP Politics | Sarkarnama

सेनेच्या लोकसभा मतदारसंघातही भाजपाची अंतर्गत बांधणी सुरु

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

येत्या 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर महाराष्ट्रात ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरु केला असून, 30 ते 35 खासदार निवडून आणण्याचे 'टार्गेट' असल्याने सेनेच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने अंतर्गत पक्षबांधणीवर भर दिल्याचे समजते.

मुंबई : केद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा शिवसेना हा जुना मित्र पक्ष असला तरी, गेल्या अडीच वर्षात महराष्ट्रात दोन्ही पक्षामधील संबंध बिघडले आहेत. त्यातून येत्या 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर महाराष्ट्रात ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरु केला असून, 30 ते 35 खासदार निवडून आणण्याचे 'टार्गेट' असल्याने सेनेच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने अंतर्गत पक्षबांधणीवर भर दिल्याचे समजते.

देशात पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी भाजपाने जोमाने तयारी सुरु केली असून, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकारी यांना 360 हून अधिक जागा जिंकण्याचे टार्गेट दिले आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अहवाल तयार केले आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपाचे 23, शिवसेनेचे 18 तर स्वाभिमानी या मित्र पक्षाचे एक असे 42 खासदार निवडून आले होते.

राज्यात सत्तेत असतानाही शिवसेनेने भाजपाला अनेकदा उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत 2019 मध्ये युती नसेल असे गृहीत धरुन राज्यातील लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्याची तयारी प्रदेश भाजपाने सुरु केली आहे. मुंबई ठाण्यासह कोकणात शिवसेनेचा प्रभाव आहे. मात्र, मराठवाडयासह अन्य ठिकाणी शिवसेनेचे जे खासदार निवडून आले त्यात भाजपासोबत युती असल्याचा सेनेला फायदा झाला होता. त्यामुळे, शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असेल तर भाजपापेक्षा सेनेला त्याचा फटका बसेल, असा अंदाज भाजपाच्या गोटातून वर्तवण्यात आला आहे.                                       

2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 30 ते 35 खासदार निवडून देण्याच्या दृष्टीने भाजपाने प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निवडीबरोबर, संबंधित मतदारसंघातील जनतेच्या समस्या, त्याचे प्रश्‍न जाणून घेवून ते सोडविण्याच्यादृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. सबका साथ सबका विकास हे सूत्र हाती घेवून भाजपाने लोकसभा मतदारसंघावर लक्ष देताना , भाजपचे खासदार नसलेल्या राज्यातील अन्य लोकसभा  मतदारसंघात पक्षपातळीवर काम सुरु केले असून, शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघावर अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे समजते.

संबंधित लेख