Maharashtra Politics Vinayak Mete unhappy for not getting ministerial birth | Sarkarnama

महायुुतीत माझ्यावर अन्यायच- विनायक मेटे

राजेभाऊ मोगल- सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 जुलै 2017

शिवस्मारकाला पावसाळ्यानंतर सुरवात

शिवस्मारकांसाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्या अधिक किंमतीच्या वाटतात. त्यामुळे संबंधित कंपनीशी तडजोड करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. काही तोडगा निघाला नाही तर मग पुन्हा नव्याने निविदा मागवाव्या
लागतील. तरी पावसाळा झाल्यानंतर शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असे विनायक मेटे यांनी सांगितले.

औरंगाबाद : सुरुवातीपासून मी महायुतीत राहिलो, सहकार्य केले, पण माझ्यावर मात्र अन्यायच झाला अशी खंत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी औरंगाबादेत बोलतांना व्यक्त केली. 

घटक पक्षांनामंत्रीपदाची संधी दिली, पण मला मात्र वचिंत ठेवले. या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मी मुंबई भेटीत नाराजी व्यक्त केली आहे. पुढेही संधी मिळेल तेव्हा नाराजी व्यक्त करीत राहीन. तरीही
भविष्यात महायुती सोबत राहणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला, पण रोज नवे आदेश आणि निकष ठरवले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. शंभर टक्के शेतीवर उपजिविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल असा नवा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे पुन्हा गोंधळ उडाला आहे. याबाबतही त्यांनी स्पष्टीकर करावे. 

मुख्यमंत्री चांगले निर्णय घेत असले तरी अधिकारी व यंत्रणेकडून त्याची अमंलबजावणी होत नाहीये. अनेक
त्रुटी आणि संथ गतीमुळे प्रत्यक्षात अजून एकाही  शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही असा घरचा आहेर विनायक मेटे यांनी सरकारला दिला.

बॅंकेच्या दारात गेलेल्या शेतकऱ्यांना पैसे नाही म्हणून परत पाठवले जाते.पैसे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरबीआयची असली तरी सरकारने यात हस्तक्षेप   करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

 अभ्यासगट स्थापन करावा

कर्जमाफीच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरुच आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय तसेच विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन एक अभ्यासगट स्थापन करावा अशी मागणी मेटे यांनी
केली. या अभ्यास गटाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष  निघतील ते महत्वाचे ठरणार आहेत.

मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करू

मराठा समाजाने काढलेल्या प्रत्येक मोर्चात आमचा सक्रीय सहभाग राहीला. आता 9 ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या महामोर्चातही सक्रीय सहभागी होत तो यशस्वी करू. शेतकऱ्यांच्या 15 दिवसांच्या संपाने यश मिळविले. मात्र, लाखोंच्या मराठा समाजाच्या मोर्चातून काहीही निष्पन्न झाले नाही. केवळ नेतृत्व नसल्यामुळेच ही वेळ आल्याचे मेटे म्हणाले.

संबंधित लेख